नगरमध्ये 15 दिवसांत पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

447

भीषण दुष्काळामुळे गेल्यावर्षी नगर जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले. जनावरांचा चारा म्हणून उसाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. परिणामी गाळपासाठी ऊस कमी शिल्लक राहिला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने साधारणपणे 60 ते 70 दिवसच चालतील, असा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील 14 पैकी नऊ कारखान्यांनी 15 दिवसांत पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

गेल्या हंगामात 2018-19 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळपाचा एक कोटी मेट्रिक टनाचा टप्पा पार केला होता. मात्र, गेल्यावर्षी दुष्काळ असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाची लागवड कमी केली. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 70 हजार 911 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. गेल्या वर्षभरात भीषण दुष्काळ पडला. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला. हिरवा चारा उपलब्ध नव्हता. तसेच उन्हाळ्यात उसाला पुरेल एवढे पाणी नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस जनावरांना चारा म्हणून विकला. त्यामुळे उसाचे क्षेत्र कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात तेवढा ऊस शिल्लक राहिलेला नाही. त्याचा परिणाम यंदाच्या ऊस गाळप हंगामावर होणार आहे. उसाअभावी जिल्ह्यातील नऊ साखर कारखाने बंद राहणार आहेत. उर्वरित 14 साखर कारखान्यांना गाळपासाठी परवानगीही देण्यात आली आहे. यातील 9 साखर कारखान्यांनी 15 दिवसांत शुक्रवारपर्यंत 4 लाख 68 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या