
वर्ष वाया जाऊ नये, यासाठी नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसमोर सध्या 17 नंबरचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेला बसण्याचा पर्याय आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘शाळा सोडल्याचा दाखला’ घ्यावा लागणार आहे. त्यावर ‘नववी नापास’ असा शेरा मिळणार असल्याने विद्यार्थी, पालक नववीच्या फेरपरीक्षेचा निर्णय कधी होणार, याची वाट पाहत आहेत.
अकरावी प्रमाणेच नववीतही अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. लॉकडाऊनच्या सुरूवातील नववीत नापास होणाऱया विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यावर फेरपरीक्षा घेऊन त्यात पास होणाऱया विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा कधी सुरू होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नववीच्या फेरपरीक्षेवरही प्रश्नचिन्ह आहे.
– नववीचे नापास विद्यार्थी शाळेच्या दहावीच्या आँनलाईन वर्गांना हजेरी लावत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी काही शाळांनी विद्यार्थ्यांना दहावीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढे नववीची फेरपरीक्षा झालीच तर त्यात पास होऊन किंवा बोर्डाचा 17 नंबरचा अर्ज भरून हे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसू शकतात, असे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी सांगितले.
फेरपरीक्षा न घेताच दहावीत पाठवा
आठवीपेक्षा नववीत अभ्यासाची काठिण्य पातळी वाढते. त्यामुळे सुरुवातीला घेतलेली चाचणी परीक्षा आणि सत्र परीक्षा याआधारे निकाल लावल्याने अनेक शाळांनी नववीत विद्यार्थ्यांना नापास केले आहे. या विद्यार्थ्यांची सध्या फेरपरीक्षा घेणे शक्य नाही. शाळा सुरू होण्याची वाट पाहत बसलो तर खूप उशीर होईल, त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापुरते दहावीत पाठवावे अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यकाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
























































