कोलकातामध्ये निपाहमुळे जवानाचा मृत्यू

41

सामना ऑनलाईन। कोलकाता

केरळ, कर्नाटकमध्ये हाहाकार उडवणाऱ्या निपाह व्हायरस कोलकातामध्ये पोहचला आहे. या व्हायरसची लागण झाल्याने येथे एका जवानाचा मृत्यू झाला आहे. सीनू प्रसाद असे या जवानाचे नाव आहे. त्याच्यावर येथील अलीपुर कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सरकारी रुग्णालयात निपाह व्हायरची लागण झालेल्या तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मूळचा केरळचा रहिवासी असलेला सीनू लष्कराच्या पूर्व क्षेत्रातील प्रमुख फोर्ट विलियम येथे तैनात होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता. त्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी २० एप्रिल रोजी कोलकाता येथे हलवण्यात आले होते. पण रविवारी त्याचा मृत्यू झाला. सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती बुधवारी लष्करातर्फे देण्यात आली. तसेच पुढील तपासणीसाठी सीनूच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात तापामुळे आजारी असलेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. यातील तीन जणांना निपाह व्हायरसची लागण झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर येथील बेलियाघाटा आयडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. निपाह व्हायरस वेगाने देशभरात हातपाय पसरत आहे. केरळमध्ये सर्वप्रथम या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कर्नाटक, तेलंगणामध्येही निपाह व्हायरसचा लागण झाल्याचे रुग्ण आढळले होते. केरळमध्ये आतापर्यंत निपाह व्हायरसने १३ लोकांचा बळी घेतला असून २०० जणांना त्याची लागण झाली आहे. या सगळ्यांवर येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. निपाह व्हायरसच्या साथीमुळे केरळमधील पर्यटन क्षेत्रालाही फटका बसला आहे.

निपाह वटवाघुळामुळे होत नाही….

निपाह व्हायरस वटवाघुळामुळे होतो असे सुरुवातीला बोलले जात होते. पण संशोधकांना केलेल्या तपासणीत हा आजार वटवाघुळामुळे नसून इतर प्राणी-पक्ष्याच्या संसर्गामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.केरळमध्ये निपाहचा व्हायरसचा पहिला बळी गेल्यानंतर संशोधकांनी फळे खाणाऱ्या व न खाणाऱ्या विविध वटवाघुळांच्या रक्ताचे नमुने तपासले .पण त्यात निपाह वटवाघुळामुळे होत असल्याचे संशोधकांना आढळले नाही. यामुळे वटवाघुळाच्या इतर प्रजातींच्या रक्ताचे नमुनेही भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. पुण्याच्या प्रयोगशाळेची संशोधकांची एक टीम कोझिकोड येथे पोहचली असून ते ही यावर संशोधन करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या