निफाडची द्राक्ष पंढरी संकटात; पारा 5 अंशांवर घसरला

निफाड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे निफाड तालुक्यातील घसरणारा पारा चिंतेचा बनला आहे. रविवारी 5 इतक्या अंशांवर तापमान असलेल्या वातावरणात बदल झाला असल्याने द्राक्ष पंढरी संकटात सापडली आहे. द्राक्षांना तडे जाणे, द्राक्ष घडामध्ये साखर न उतरणे, द्राक्ष घड फुगवण कमी होणे यामुळे वजन घटणार… परिणामी वातावरणात बदल झाल्याने शेतकऱयांना आर्थिक झळही बसणार आहे. सध्या निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष हंगाम जोरात सुरू असतानाच बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्ण मोडकळीस आला आहे. तालुक्यात द्राक्ष तोडणी हंगामास सुरुवात झाली आहे. अचानक थंडी वाढल्याने द्राक्ष दरात घसरण होत आहे. तसेच याचाही फायदा व्यापारी वर्ग दर पाडून उचलत आहे. अशा परिस्थितीत व्यापारी वर्गाकडून द्राक्षाचे दर मनाप्रमाणे ठरवण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. हंगामात अचानक वातावरण बदलल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.