
बायकोचा अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर एका अनिवासी हिंदुस्थानी व्यक्तीने कुटुंबासहित आत्महत्या केली आहे. कुलविंदर सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. बुधवारी जेव्हा जॉर्डनवरून कुलविंदर कपूरथाळा येथे आपल्या गावी परतला, तेव्हा त्याने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाहिला. त्यानंतर त्याने आपल्या दोन मुली, बायकोसह जाळून घेत आत्महत्या केली.
पंजाबमधील कपूरथाळा जिल्ह्यात राहणारा कुलविंदर सिंग हा गेल्या दीड वर्षांपासून जॉर्डनला स्थायिक होता. तो बुधवारी जेव्हा आपल्या गावी आला, तेव्हा रात्री त्याला एक अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आला. तो व्हिडीओ त्याची बायको मनदीप आणि त्याच गावातील एका गुरप्रीत सिंह नावाच्या व्यक्तीचा होता. तो व्हिडीओ पाहून त्याने पेट्रोल आणले आणि रात्री स्वत:सहित बायको आणि दोन मुलींना जाळून घेत आत्महत्या केली.
ही घटना दुसऱ्या दिवशी घरातील इतर सदस्य उठल्यानंतर कळली. परंतु त्यावेळी कुलविंदर सिंगचा मृत्यू झाला होता. मनदीप आणि तिच्या दोन मुलींना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे दाखल होण्यापूर्वी त्यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत हा मनदीपला फोटो आणि व्हिडीओ वायरल करेन, अशी धमकी देत ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी आरोपी गुरप्रीत सिंह तसेच त्याची आई सत्यादेवी आणि इतर दोन जणांना पोलिसांना अटक केली आहे.

























































