
सामना ऑनलाईन । मुंबई, नवी दिल्ली
पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीविरोधात हिंदुस्थानसह 5 मोठय़ा देशांनी मोठी कारवाई केली आहे. नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांची तब्बल 637 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात मालमत्ता, ज्वेलरी, आलीशान फ्लॅटस्, बँक बॅलेन्स यांचा समावेश असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने दिली आहे.
हिंदुस्थानच्या तपास यंत्रणांनी आर्थिक घोटाळा प्रकरणांमध्ये परदेशातील मालमत्ता जप्त करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अमेरिकेत नीरव मोदीची 216 कोटी रुपये मूल्य असलेल्या 2 स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याशिवाय सिंगापूर आणि इतर देशांमधील बँकेतील जमा रक्कम, मुंबईतील आलीशान फ्लॅट आणि आभूषणेही जप्त करण्यात आली आहेत. लंडन, न्यूयॉर्क येथील मालमत्ता आणि सिंगापूरमधून हिरे हिंदुस्थानात आणण्यात आले. ईडीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत हिंदुस्थानच्या तपास यंत्रणांनी मुंबईच्या न्यायालयातून अनेक न्यायिक विनंतीपत्रे अमेरिका, ब्रिटन, स्विर्त्झलँड, हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये पाठवण्यात आली आहेत.
या मालमत्तांवर टाच आणली
-न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क येथील गजबजलेल्या भागात असलेल्या आणि नीरव मोदीच्या नावे असलेल्या 216 कोटींचे 2 आलिशान फ्लॅट.
-मोदीची बहीण पूर्वीच्या नावे लंडनच्या मर्लिबोन रोड येथील 35.97 कोटी रुपयांचा फ्लॅट.
-दक्षिण मुंबईतील 19.5 कोटी रुपयांचा फ्लॅट. हा फ्लॅटही पूर्वीच्या नावावर आहे.
-याशिवाय ईडीने नीरव मोदी, पूर्वी तिचा पती मयंक मेहता आणि इतर आरोपींच्या पाच बँक खात्यांतील 278 कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस
इंटरपोलने मोदी, आदित्य नानावटी, नीशाल, पूर्वी आणि तिचा कर्मचारी सुभाष परब यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. दरम्यान, हाँगकाँगमधून 22.69 कोटी रुपये किमतीच्या हिऱयांचे दागिनेही हिंदुस्थानात आणण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. दरम्यान, नीरव मोदीची दागिन्यांची काही शोरूम्सही ईडीच्या रडारवर असून लवकर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.


























































