नीरव मोदी येणार, आर्थर रोड तुरुंगात मुक्काम करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएनबी घोटाळ्यातील वॉण्टेड हिरे व्यापारी नीरव मोदीला लवकरच हिंदुस्थानात आणले जाणार आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानने ब्रिटनच्या न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज अखेरची सुनावणी झाली. न्यायालयाने त्याला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच त्याचा ताबा घेतला जाईल आणि त्याचा पुढील मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असेल.

लंडनमधील न्यायालयात याप्रकरणी ऑनलाइन सुनावणी झाली. न्यायाधीश सॅम्युअल गुजी यांनी नीरव मोदीविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे मान्य केले. गेली दोन वर्षे ही सुनावणी सुरू होती. नीरव मोदीविरुद्ध हिंदुस्थानातही खटला सुरू आहे. त्याला हिंदुस्थानच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला न्याय मिळणार नाही असे मानता येणार नाही असे न्यायाधीशांनी सांगितले. नीरव मोदीने आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा न्यायालयात केला, परंतु न्यायाधीशांनी तो फेटाळून लावला.

मुंबईतील तुरुंग लंडनपेक्षाही अधिक चांगले

मुंबईतील आर्थर रोड तुरुंग हे लंडनमधील तुरुंगांपेक्षाही चांगले असून तेथील बॅरेक नंबर 12 मध्ये नीरव मोदीसाठी पुरेशा सुविधा आहेत असेही न्यायाधीशांनी सांगितले. कोरोना आणि हिंदुस्थानातील तुरुंगांमधील खराब व्यवस्थेमुळे मोदीवर मानसिक परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद मोदीच्या वकिलांनी केला. तोसुद्धा न्यायाधीशांनी फेटाळून लावला.

आता प्रत्यार्पण कधी?

पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी हा आरोपी आहे. त्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीनेही त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत. सध्या तो लंडनच्या वॉड्सवर्थ तुरुंगात आहे. आता मोदीच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटनच्या गृह मंत्रालयाकडे जाईल. प्रत्यार्पणावर तेथील गृहमंत्री प्रीती पटेल यांचे शिक्कामोर्तब होईल. लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका करण्याचा पर्याय मोदीकडे शिल्लक आहे. तो उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानेही प्रत्यार्पणाला परवानगी दिली की नंतर त्याला हिंदुस्थानात आणण्याची प्रक्रिया सुरू होईल.