दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या वेळी मुकेश दिल्लीत हजरच नव्हता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशी झालेल्या दोषींना वाचवण्यासाठी त्यांचे वकील आता अतिशय घृणास्पद आणि संतापजनक खेळी खेळू लागले आहेत. निर्भयाच्या सर्व 4 दोषींना येत्या 20 मार्चला फासावर लटकवले जाणार आहे. पण दोषी मुकेश सिंहचे वकील एम एल. शर्मा यांनी दिल्लीच्या एका स्थानिक न्यायालयात आपला अशील निर्भयावरील सामूहिक बलात्काराप्रसंगी घटनास्थळी हजरच नव्हता, असा अजब दावा करीत मुकेशला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. दोषींचा वकिलाचा हा खेळ म्हणजे फाशीच्या अंमलबजावणीत सतत अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. दोषींच्या वकिलांच्या या कृतीने दिल्लीकर नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

दिल्लीच्या स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करीत दोषी मुकेशच्या वकिलांनी निर्भया प्रकरणातील नराधमाला वाचवण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न सुरु केला आहे. आपल्या नव्या याचिकेत मुकेश म्हणतो, मला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आणि 17 डिसेम्बर 2012ला दिल्लीत आणले. निर्भयावरील बलात्काराची घटना घडली तेव्हा मी दिल्लीत नव्हतीच मुळी. मला या घटनेच्या एक दिवसानंतर दिल्लीत आणले गेले.सरकारी वकिलांनी मात्र मुकेश आणि त्याच्या वकिलाचा दावा फेटाळून लावत हा फाशी लांबवण्याचा नवा मार्ग असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या न्यायालयाने मुकेशच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे.

डेथ वॉरन्टपे “डेथ वॉरंट”

न्यायालयीन खटल्यातील तारीख पे तारीखप्रमाणेच निर्भया प्रकरणातील दोषी आणि त्यांच्या वकिलांनी आपल्या अशीलांची फाशी लांबवण्यासाठी आतापर्यंत अनेक क्लुप्त्यांचा आधार घेतला आहे.त्यामुळे तिहार तुरुंग प्रशासनावर डेथ वॉरंटवर डेथ वॉरंट काढण्याची वेळ आली आहे. कारण कायद्यातील पळवाटांचा आधार घेत निर्भयाच्या दोषींनी आतापर्यंत तीनदा त्यांच्या फाशीचे डेथ वॉरंट रद्द करायला लावले आहे. 16 डिसेम्बर 2012 या दिवशी रात्री पाच नराधमांनी चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार करीत तिला गंभीर जखमीही केले होते.आता नराधम मुकेशची युक्ती त्याचा मृत्युदंड किती लांबवते आणि चारही या नराधमांना फासावर कधी लटकवले जातेय याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.