
2012 साली देश हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणातील चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता तिहार कारागृहात फाशी देण्यात येणार आहे. यासंबंधी पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी केले आहे. मात्र, आता या याचिकेमुळे ही फाशी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
पटियाला हाऊस कोर्टाने तीन वेळा डेथ वॉरंट जारी केलं आहे. कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे यापूर्वी दोन वेळा नराधमांची फाशी पुढे ढकलली गेली होती. नराधम आरोपींकडून फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी कायदेशीर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न झाला. पहिल्यांदा 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. त्यानंतर 1 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती. मात्र, त्यानंतर नवीन डेथ वॉरंट जारी करून 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
पटियाला हाऊस कोर्टाने तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी केल्यानंतरही नराधम दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी आपल्याकडे अजूनही पर्याय आहे, असा दावा केला होता. अक्षय कुमारसाठी ते नवीन दया याचिका करणार आहेत. तर पवन गुप्तासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठविण्याची तयारी वकिलांनी सुरू केली होती. त्यानुसार, पवन कुमार गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. जर सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत या याचिकेवर सुनावणी झाली नाही, तर फाशीची तारीख पुन्हा टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

























































