फाशी टाळण्यासाठी निर्भयाचा मारेकरी विनयकुमारची याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्भया गँगरेप प्रकरणातील चार दोषींपैकी एकाने विनयकुमार शर्मा याने आपली फाशी टाळण्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्याने कोर्टात क्युरेटीव्ह याचिका दाखल केली असून आपल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती सतीशकुमार अरोरा यांनी मंगळवारीच या चौघा दोषींचा ‘डेथ वॉरंट’ जारी केला आहे.

या गँगरेप प्रकरणात मुकेश, विनय शर्मा, अक्षय सिंह आणि पवन गुप्ता या चार नराधमांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फासावर लटकविण्यात येणार आहे. फाशीच्या या निर्णयावर अंमलबजावणी झाल्यावर महिलांमध्ये कायद्यावरील विश्वास वाढायला मदत होईल, असे निर्भयाच्या आईने म्हटले आहे. शिक्षा देण्याची वेळ जसजशी जवळ येतेय तसतशा तिहार कारागृहातील हालचालींना वेग आला आहे. कारागृहाच्या प्रमुखांनी या फाशीसाठी प्रशिक्षित जल्लादाची मागणी उत्तर प्रदेश कारागृह प्रशासनाकडे केली आहे.