
निर्भया प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी देण्याच्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. भानुमती बेशुद्ध पडल्या. काही वेळानंतर त्या शुद्धीवर आल्या. सुनावणीसाठी बसलेले इतर न्यायाधीश आणि महिला कर्मचाऱयांच्या मदतीने न्यायमूर्ती भानुमती यांना त्यांच्या कक्षात नेण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे केंद्राच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
नवी दिल्लीतील निर्भया सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणातील दोषींना स्वतंत्रपणे फाशी देण्याची मागणी करीत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारच्या या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. या वेळी न्यायमूर्ती भानुमती यांची प्रकृती अचानक बिघडली. खंडपीठाने या प्रकरणातील दोषी विनय शर्माने राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.























































