Nisarga Cyclone – पालिकेने 50 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

197

मुंबईत धडकलेल्या निसर्ग वादळाच्या धोक्यामुळे किनारपट्टी, खाडी आणि धोकादायक ठिकाणी राहणार्‍या तब्बल ५० हजारांवर रहिवाशांना पालिकेने ३५ शाळा, निवारा केंद्रे आणि काहींच्या नातेवाईंकाडे सुरक्षितरीत्या हलवले आहे. शाळा, निवारा केंद्रांच्या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये पालिका मुख्यालयात २४ तास सुरू असणार्‍या आपत्ती व्यवस्थापन विभागातून संपूर्ण मुंबईतील स्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, अक्सा, गोराई अशा चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्ड बोटी, जेट की यांच्यासह बचावकार्यासाठी आवश्यक साधनसामग्री घेऊन तैनात ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अग्निशमन दलाचे रेस्क्यू टीममधील प्रशिक्षित १५० जवानही फायर स्टेशन्सवर तैनात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, मंगळवारपासून किनार्‍यावर वादळाचा धोका असणार्‍या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये वरळी कोळीवाडा येथील सुमारे ५० कुटुंबातील दोनशेहून अधिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली. याशिवाय मढ, मार्वे, जुहू या ठिकाणच्या शेकडो रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पाच हजार कॅमेर्‍यांची नजर
पालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट, उद्याने विभाग, जनसंपर्क विभाग यांचे प्रतिनिधी समन्वय साधला जात आहे. याशिवाय मुंबईभरात लावलेल्या तब्बल पाच हजारांवर कॅमेर्‍यांचे थेट प्रक्षेपण आपत्कालीन विभागात दिसत आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे.

३०० ठिकाणी पंप, ९६ पथके
– पाणी साचणार्‍या संभाव्य ३०० ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत. तसेच सहाही पंपिंग स्टेशन्सवर आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले आहे. अतिसंवेदनशील भाग, रुग्णालये या ठिकाणी विज गेल्यास गैरसोय होऊ नये यासाठी जनरेटर उपलब्ध करण्यात आले आहेत.
– धोकादायक झाडे, फांद्या पडल्यास तातडीने कार्यवाही करता यावी यासाठी प्रत्येक विभागामध्ये चार याप्रमाणे ९६ पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. या शिवाय वादळ, पाण्यात गाड्या अडकल्यास टोइंग करण्याची व्यवस्थाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

एनडीआरएफ, नौदलाच्या तुकड्या तैनात
वादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या तीन तुकड्यांसह नौदलाच्या पाच तुकड्याही मुंबईत तैनात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये कुलाबा, वांद्रे, अंधेरी, मालाड, बोरिवली येथे या टीम कर्तव्यावर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या