निसर्ग चक्रीवादळाचा खेड तालुक्याला तडाखा, अनेक झाडे कोसळली

734

खेड तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाने चांगलाच तडका दिला आहे. अनेक ठिकाणांनी वृक्ष उन्मळून पडले आहेत तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत तर काही खांब उन्मळून पडले आहेत. खेड शहरातील नगरपालिका कार्यालयासमोरील रस्त्यावर भला मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने हा मार्ग बंद झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे काल रात्रीपासूनच तालुक्यातील जनतेने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली होती. 2008 साली झालेल्या फयान चक्रीवादळाचा अनुभव असल्याने अनेकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती. मात्र तरीही तालुक्यात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

सकाळी सहा वाजल्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. मात्र पावसासोबत तितकासा वारा नव्हता. त्यामुळे पहाटेच्या वेळेत काहीजणांनी बाहेर पाडण्याचे धाडस केले होते. मात्र ११ वाजल्यापासून जोराचा वारा वाहण्यास सुरुवात झाली. काही वेळातच जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडू लागले. चक्री वादळाचा धोका ओळखून महावितरणने सकाळी 6.45 मिनिटांनीच वीजपुरवठा बंद केला होता त्यामुळे विजेमुळे होणारे अनर्थ टळले आहेत.

वादळाचा मोठा तडाका खाडी पट्टा परिसराला बसल्याचे वृत्त आहे. या भागात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गेल्या काही तासात नक्की किती नुकसान झाले हे अदयाप कळलेले नाही. मात्र झालेले नुकसान मोठे असल्याचे बोलले जात आहे. खेड शहरातील नगरपालिका कार्यालयासमोर असलेलले मोठे आंब्याचे झाड सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास पडले. यामुळे हा रास्ता बंद झाला. या घटनेची खबर मिळताच खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यात कोसळले झाड तोडून बाजूला करण्यात आले.नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ रस्त्यात पडलेले झाड तोडून बाजूला केल्याने बंद झालेला रास्ता मोकळा झाला.

तालुक्यातील मोरवंडे पिंपळवाडी येथील विनय सकपाळ व राकेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार निसर्ग चक्रीवादळामुळे पिंपळवाडीतील काही विजेचे पोळ वाकले आहेत तर काही पोळ उन्मळून पडले आहेत. काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. एक-दोन ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या आहेत.आधीच कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या जनतेवर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट कोसळले आहे त्यामुळे या दोन्ही संकटातून बाहेर पडताना जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या