निसर्ग वादळग्रस्तांना झाड निहाय मदत मिळावी; आमदार योगेश कदम यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

697

निसर्ग वादळामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेल्या नुकसानग्रस्तांना प्रत्येक झाड निहाय मदत मिळावी, तसेच ही मदत त्या झाडाचे पुढील काही वर्षाचे उत्पन्न गृहीत धरून असावे अशी मागणी खेड दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कदम यांनी नुकतीच पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

उपमुख्यमंत्री पवार यांना देण्यात आलेला निवेदनात आमदार कदम यांनी म्हटले आहे कि, ३ जुन रोजी झालेल्या निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दापोली,मंडणगड, यासह खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातील अनेक गावे या वादळात बाधित झाली आहेत. दापोली आणि मंडणगड या दोन्ही तालुक्यांमध्ये बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून मदत देण्यास सुरवात करण्यात आली आहे.

कोकणामध्ये फळझाडांची लागवड करताना प्रति गुंठा एक झाड अशी न करता कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावली जातात त्यामुळे मदत देताना ते प्रति गुंठा न देता झाड निहाय दिली जावी. शिवाय त्या झाडाचे आयुमान ठरवून पुढील काही वर्ष त्या झाडापासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरले जावे. फळबागायतदारानी फळ प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी घेतलेले कर्ज पूर्ण माफ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या बैठकीदरम्यान पवार यांच्याशी आमदार योगेश कदम यांनी फळबागा, कृषीविषयक उद्योग, पर्यटन उद्योग व इतर महत्वपूर्ण विषयांवरही चर्चा केली.

आपली प्रतिक्रिया द्या