40 टक्के प्रदूषण तर वाहतुकीमुळे होते, वाढत्या वायू प्रदूषणावर नितीन गडकरी यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

nitin-gadkari-delhi

मी दिल्लीत केवळ दोन दिवस थांबतो. प्रदूषित हवेमुळे मला इन्फेक्शन झाले. संपूर्ण दिल्ली प्रदूषणामुळे त्रस्त आहे.
नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) – दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या घटकांची माहिती देताना गडकरी म्हणाले, ‘मी रस्ते वाहतूक मंत्री आहे. 40 टक्के प्रदूषण तर आमच्यामुळे होते. कारण पेट्रोल, डिझेल असे जीवाश्म इंधन वापरल्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मंचावर बसलेल्या मान्यवरांना उद्देशून गडकरी म्हणाले, आज राष्ट्रवादाचे सर्वात मोठे प्रारूप काय असेल, तर देशातील आयात कमी करून निर्यात वाढवणे. आज दिल्लीत आपली काय परिस्थिती झाली आहे? मी दोन दिवसही इथे राहू शकत नाही. आपण मोठय़ा प्रमाणात जीवाश्म इंधन आयात करत आहोत. यामुळे आपल्याला मोठी आर्थिक आणि पर्यावरणीय किंमत मोजावी असल्याचे स्पष्ट करत गडकरी यांनी विद्युत आणि हायड्रोजन आधारित ऊर्जेकडे जाणे, ही राष्ट्रवादाची बाब झाली असल्याचे मत व्यक्त केले.

–  आज आपण जीवाश्म इंधनाच्या आयातीसाठी 20 लाख कोटी रुपये खर्च करत आहोत. हा कोणत्या प्रकारचा राष्ट्रवाद आहे? यातून आपण केवळ प्रदूषण आयात करत आहोत. आपण भारतासाठी पर्याय उभा करू शकत नाहीत का?

– देशाअंतर्गत स्वच्छ इंधन पर्याय निर्माण करण्याची क्षमता भारताकडे आहे. शेतकरी आता केवळ अन्न उत्पादनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. या देशातील शेतकरी एक दिवस ऊर्जादाता, इंधनदाता आणि विमान इंधन पुरवठादारही बनेल.

– जीवाश्म इंधनाला पर्याय असल्याचे सांगताना गडकरी पुढे म्हणाले की, सध्या विद्युत आणि हायड्रोजन पॉवर वाहने आर्थिकदृष्टय़ा परवडणारी झाली आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे उत्सर्जन आणि वाहन चालविण्याचा खर्च कमी झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.