कृषीवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी पुढाकार घ्या -नितीन गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषीवर आधारित उद्योगांना चालना मिळावी, यासाठी कॉर्पोरेट उद्योजकांनी कृषी उद्योगांतील गुंतवणुकीवर अधिक भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितिन गडकरी यांनी संभाजीनगरमध्ये केले. चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित एसएसएमई असोसिएशनच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना गडकरी बोलत होते.

उद्योजकांनी कृषी आधारित खादी उद्योग, शेरी कल्चर, फर्नीचर, बायोइंधन, बांबु तसेच सोलार क्लस्टर यासारख्या उद्योगांवर भर द्यावा. ग्रामीण उद्योगांचा विकास झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होवून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे त्याचा शहरी उद्योगांवरही सकारात्मक परिणाम होईल, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, केंद्रीय उद्योग सचिव राममनोहर मिश्रा, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मराठवाडा लघुउद्योग व कृषी संघटनेचे अध्यक्ष डी.एल.राजळे, तसेच उद्योजक राम भोगले, ऋषीकुमार बागला, किशोर राठी, मुकुंद कुलकर्णी, एच.डी.कापसे, मानसिंग पवार, विवेक देशपांडे यांच्यासह इतर उद्योजक, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उद्योजकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी
गडकरी यांनी एसएसएमईच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच उद्योगांच्या विविध धोरणांबाबत चर्चा करून भविष्यातील उद्योगांपुढे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर उद्योजकांनी उद्योगांसाठी बँकांवर अवलंबून राहण्यापेक्षा शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करावी. तसेच उद्योगांतील नवनिर्मितीवरही भर द्यावा, असेही गडकरी म्हणाले.

विदर्भातील सहा जिल्हे डिझेलमुक्त होणार
डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने उद्योजकांना मालाची वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे. केंद्र सरकारने नवीन तंत्रज्ञानाने विकसीत केलेले सीएनजी गॅस वाहनांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा हे सहा जिल्हे मार्चपासून डिझेलमुक्त होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.