
पुण्यात तीनमजली उड्डाणपूल बांधत आहोत. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या खासदार, आमदारांची एक बैठक बोलवा. आमच्या अधिकाऱ्यांना आराखडा द्या. त्यानंतर या भागातील एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, असा महामार्ग आपण बांधू, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कोल्हापूर ते सांगली रस्त्याचे सहा महिन्यांत काम सुरू करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कराड येथे सहा हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण व कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार संजयकाका पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, सामूहिक विवाह होतो तसा आजचा कार्यक्रम आहे. सर्वच मतदारसंघांतील कार्यक्रमांचा एकत्र कार्यक्रम आहे. पालखीमार्ग आळंदी ते पंढरपूर हा 12 हजार कोटींचा होत आहे. श्रीनिवास पाटील यांनी मला निवेदन दिले. त्यामधे महापुरात अडकलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी होती. खंबाटकी घाटाचे काम महाराष्ट्रात मंत्री असताना काम करायची संधी मिळाली. लोकांची वाहतूककोंडीमध्ये होणारी अडचण पाहून त्यावेळी तातडीने निर्णय घेतला. घाटात टनेल तयार केले. आता तिथे दुसरा एक टनेल निर्माण होत आहे. कोल्हापूर ते सांगली रस्त्याचे काम पुढच्या सहा महिन्यांत सुरू करू, याची ग्वाही त्यांनी दिली.
पुण्यात तीन मजली उड्डाणपूल बांधत आहोत. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या खासदार, आमदारांची एक बैठक बोलवा. आमच्या अधिकारी यांना आराखडा द्या. या भागातील एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, असा बांधू. पुणे ते बंगळुरू नवा महामार्ग तयार आता करत आहोत. उत्तर हिंदुस्थानातून येणारी वाहतूक मुंबई, सातारा, पुण्याकडे जाते. ती वाहतूक सुरतवरून नाशिक, नगर ते तमिळनाडू अशी वळविण्यासाठी रस्ता करतो आहोत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते नगर, पुणे ते सोलापूर असा मेट्रो प्रकल्प राबवण्याचा विचार आहे. ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी असेल. तिचे स्पीड ताशी 140 असेल. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर केवळ पावणेतीन तासांत जाईल. हा प्रकल्प दिशादर्शक असेल. पहिले प्राधान्य जलमार्ग आहे. महाराष्ट्रात जलमार्गाचा विकास व्हावा, असे वाटत असल्याचेही ते म्हणाले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शेंद्रे ते कागल हा महामार्ग 2014 साली होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला थोडा उशीर झाला. आज या परिसरात या कामांचा शुभारंभ होत आहे. या कामांना सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घ्यायला हवी. रस्ता म्हटले की हल्ली गडकरी साहेबांचे नाव असते. ते जे प्रकल्प सुचवतील त्याला त्या प्रकल्पांना राज्य सरकारचे सहकार्य असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.





























































