फडणवीस दिल्लीला गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी! गडकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप प्रदेशाध्यक्ष असलेला माणूस पुढे काय होतो, असे वक्तव्य करतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी असल्याची सूचक टिपणी करत भाजपमधील आगामी बदलाचे संकेत त्यांनी दिले.

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मी असे म्हणत नाही की बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष पुढे काय होतात हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे माध्यमांनी ‘गडकरींचे संकेत-फडणवीस केंद्रात जाणार’ अशा बातम्या माझ्या नावाने चालवू नका, तर तुमच्या नावाने चालवा असा चिमटाही काढला. राजकारण्यांची मुले राजकारणात असण्यात गुन्हा नाही, पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर जागा निर्माण करावी. लोकांनी स्वतःहून मागणी केल्यास राजकारण्यांच्या मुलांना तिकीट द्यायला हरकत नाही, पण केवळ वारशाने तिकीट कोणी मागू नये, असे खडे बोल गडकरी यांनी सुनावले.

बावनकुळे माणसाला बाई बनवतील
गडकरी म्हणाले, सांगू नये, पण बावनकुळेंमध्ये एवढे कर्तृत्व आहे की, ते माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील. कोणती फाईल कशी करतील. कुणाचे पत्र घेतले अन् कोणाचा निधी कुठे नेला, कोणत्या गावात नेला हा पत्ताही लागणार नाही, असा टोला लगावत गडकरींनी आपल्या कामात ओनरशिप हवी ती त्यांच्याकडे असल्याचे नमूद केले.

भाजपमधील घराणेशाहीवर गडकरींचे बोट
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कार्यकर्त्याला सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलगा-मुलगी, बायको अणि मेहुण्याला तिकीट मागण्याचे धंदे आता बंद करा, असे भरकार्यक्रमात स्वपक्षाच्या आमदार- खासदारांना सुनावत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमधील वाढत्या घराणेशाहीवर बोट ठेवत त्यास कडाडून विरोध केला.