पंढरपूर – रस्त्यांचा दर्जा तपासा मगच लोकार्पण करा, गडकरींच्या मार्गात नाराजीचा ‘गतिरोधक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर शहराला जोडणारे बहुतांश रस्ते हे निकृष्ट दर्जाचे झालेले असून केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सदर कामांचा आढावा न घेता या कामांचे लोकार्पण आणि नियोजित कामांचे भूमिपूजन करु नये अशी आग्रही मागणी पंढरपूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी केली आहे. लोक नाराजीचे हे ‘गतिरोधक’ गडकरी हे कसे पार करतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

येत्या 30 ऑक्टोबरला गडकरी हे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या खात्याअंतर्गत असलेल्या देहू-आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या इतर पालखी मार्गांचा लोकार्पण सोहळा अशा दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नियोजित दौऱ्याच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये भव्य सभामंडप आणि व्यासपीठ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे.

गडकरी यांच्या दौऱ्याची कुणकुण लागताच पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून गडकरी यांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे लोकार्पण करु नये त्याच बरोबर देहू आळंदी मार्गाचे भूमिपूजन करु नये अशी आग्रही मागणी केली आहे. खास करुन पंढरपूर कुर्डुवाडी या मार्गावरील ग्रामपंचायतींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

210 कोटी रुपयांचा हा सिमेंट महामार्ग तयार करुन एक वर्ष देखील झालेले नाही. या रस्त्याला सर्वत्र भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या बाजूला असलेले ड्रीनेज, बस स्थानक, विद्युत दिवे आदी कामे अपूर्ण आहेत तर झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आष्टी, लऊळ, रोपळे, बाभूळगाव, आढीव आदी ग्रामपंचायतींनी केला आहे.

सदर रस्त्यांचे काम सुरु असतानाच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी या ग्रामपंचायतींनी Rsiil व ठेकेदाराकडे केली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या महामार्गावरील ग्रामस्थांनी गडकरी यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालू असा इशारा दिला आहे. त्यामुळे दौरा करण्यापूर्वी संबंधित कामांची तपासणी, विना परवाना शासनाचा मरुम उचलणे त्याची चोरी करणे आदी आरोप ठेकेदारावर आहेत महसूल विभागाने संबंधित ठेकेदारांना कोट्यवधी रुपये दंड भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची वसुली ठेकेदारांकडून करावी आणि दोषी असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करुन मगच लोकार्पण आणि भूमिपूजन करावे अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

कर्तव्य कठोर गडकरी

गडकरी यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज पत्रकार परिषद बोलाविली होती. यावेळी पत्रकारांनी ग्रामपंचायतींच्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना परिचारक म्हणाले, गडकरी हे कर्तव्य कठोर मंत्री आहेत ते कोणत्याही ठेकेदाराच्या मिद्यामध्ये नाहीत. रस्त्याबाबत लोकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आपण संबंधित विभागाचे अधिकारी येत्या एकदोन दिवसांत येणार असून त्यांच्या कानांवरही बाब मी घालणार आहे. रस्त्यांच्या कामांबाबत गडकरी हे तडजोड करीत नाहीत. तक्रारींची गडकरी निश्चित दखल घेतील असेही परिचाकर म्हणाले.