मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण : मंत्रिमंडळ उपसमितीतील चर्चा सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेल्या जीआरच्या विषयावर मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली. पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर डॉ. राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून या प्रश्नावर निश्चितच तोडगा निघेल याची मला खात्री आहे, असे राऊत म्हणाले. ” आजच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली. या विषयावर निर्णय घेण्याबद्दल एकमत झाले. या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची पुढील सुनावणी 21 जून रोजी आहे. त्यामुळे थांबायचे की पुढे जायचा हा पेच आहे. मात्र उपसमिती या विषयावर सकारात्मक आहे,” असे डॉ. राऊत यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अॅड. के. सी.पाडवी, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.

“या संदर्भात कायदेशीर अभ्यास करायचे आम्ही ठरवले आहे. कायदेशीर बाबी अनेक आहेत, तशाच इतरही अनेक बाबी आहेत आणि सकारात्मक निर्णय होईल. तीन पक्षाचे सरकार आहे. आता फक्त निर्णयाप्रत पोहोचायचं आहे. अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय सकारात्मक असेल”, असे ते म्हणाले.

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या आरक्षणावर भर देऊन ते कसे कार्यान्वित करता येईल या विषयी चर्चा झाली. लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.