
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहार येथील मुजफ्फरपूरमध्ये ३४ मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला असून उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली हा तपास व्हावा अशी इच्छा असल्याची माहिती नीतिश कुमार यांनी दिली आहे.
नीतिश यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात राजकारण आणणं चुकीचं आहे. सरकार म्हणून आम्ही या प्रकरणात आधीच तपासप्रक्रियेला सुरुवात केली आहे. पण, आमच्यावर मौन बाळगल्याचा आरोप केला गेल्याचं नीतिश यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. हा तपास उच्च न्यायालयाच्या अंतर्गत व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे जर या प्रकरणात कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं नीतिश यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणातील मंजु वर्मा या मंत्र्याच्या सहभागावरही नीतिश या परिषदेत बोलले. आमच्या मंत्रिमंडळापैकी जर कुणी या प्रकरणात सामील असेल, तर त्याची गय केली जाणार नाही, असं नीतिश म्हणाले आहेत.
#WATCH live from Patna: Bihar CM Nitish Kumar holds press conference on #MuzaffarpurShelterHome case https://t.co/ZNKS1qqdlB
— ANI (@ANI) August 6, 2018
मुजफ्फरपूर प्रकरणात बिहारच्या सामाजिक कल्याण मंत्री मंजु वर्मा यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला गेला होता. त्यानंतरही या प्रकरणावर नीतिश यांनी बाळगलेल्या मौनामुळे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला वाचवण्यासाठीच नीतिश गप्प बसले आहेत, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. कारण, मंजु वर्मा यांनी ब्रजेश ठाकूर संचालित असलेल्या या बालिकाश्रमाची पाहणी केली होती आणि सर्वकाही ठीक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरच हे प्रकरण उघडकीला आलं होतं. त्यामुळे नीतिश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली आहे.




























































