
जुनी इमारत कोसळल्यास महापालिका अधिकारी व इमारत मालकावर गुन्हा नोंदवला जातो, पण भाडेकरूंवर काहीच कारवाई होत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. हे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पर्ह्ट परिसरातील 100 वर्षे जुनी आग्रा इमारत पाडण्याचे आदेश दिले.
न्या. गौतम पटेल व न्या. कमल खथा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या इमारतीची दुरुस्ती 6 महिन्यांत न केल्यास ती धोकादायक ठरवली जाईल, असे महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने सांगितले होते. या 6 महिन्यांत केवळ विजेचे मीटर बसवणे व अन्य कामे करण्यात आली. त्यामुळे इमारत दुरुस्तीसाठी अजून मुदत द्यावी ही विनंती मान्य केली जाऊ शकत नाही, असे नमूद करत न्यायालयाने ही इमारत पाडण्याचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण
फोर्ट परिसरातील आग्रा इमारत 100 वर्षे जुनी आहे. ही इमारत दोन मजली आहे. तेथे एकूण 39 भाडेकरू आहेत. इमारतीच्या नावाने ही याचिका केली होती. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला. मूळ मालकाने इमारतीचे स्वतंत्र ऑडिट केले. ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल या ऑडिटद्वारेही देण्यात आला. भाडेकरूंनीदेखील इमारतीचे ऑडिट केले. त्यांनी केलेल्या ऑडिटनुसार ही इमारत धोकादायक नाही. इमारतीची डागडुजी करण्याचा सल्ला या ऑडिटद्वारे देण्यात आला. पालिकेने ही इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली. ही नोटीस रद्द करावी. इमारत दुरुस्तीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
समितीमध्ये सुधारणा करण्याची गरज
तांत्रिक सल्लागार समितीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. कारण भाडेकरू या समितीचा गैरवापर करत आहेत. इमारत मालकाचे अधिकार नष्ट करण्यासाठी भाडेकरू याचा आधार घेत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारच 2014 मध्ये समिती स्थापन झाली. नंतर ही समिती पालिकेच्या धोरणाचा भाग झाली. या धोरणात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा 2018 मध्ये न्यायालयाने दिला. ही समिती म्हणजे आमचा मूलभूत अधिकारच आहे, असा समज भाडेकरूंचा झाला आहे. म्हणूनच सल्लागार समितीचे अहवाल सादर केले जातात. या अहवालाला आव्हान दिले जाते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

























































