धान्य घोटाळ्यातील आरोपींना जामीन नाकारला

27

सामना प्रतिनिधी । नांदेड

इंडिया मेगा अनाज अँग्रो कंपनीतील शासकीय धान्य घोटाळा प्रकरणातील आरोपींची तीन दिवसांची कोठडी संपल्यानंतर न्यायधिशांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर मंगळवारी आरोपींच्या वकीलानी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र जामीनावर १५ मे रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आज गुरुवारी दुपारी ३ वाजता जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या जोरदार दणक्याने धान्य घोटाळ्यातील आरोपींना चांगलीच चपराक बसली आहे.

नांदेड जिल्ह्यात प्रचंड गाजलेल्या धान्य घोटाळ्यातील अटकेत असलेल्या इंडिया मेगा अनाज अँग्रो कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडीया, शासकीय धान्याचे वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार व हिंगोलीचे ललितराज खुराणा यांना १४ मे रोजी दुपारी दोन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींची तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने नायगाव येथील कनिष्ठस्तर न्यायालयात हजर करुन अन्य काही बाबींचा तपास करावयाचा असल्याने पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण आरोपींच्या वकीलानी तपास करण्यासाठी पोलीसाकडे दहा महीन्यांचा वेळ असतांना काहीच केले नाही आणि आता पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करत आहेत, असा आरोप केला आणि जामीन देण्याची विनंती केली होती. सरकारी वकील इंदूरकर व आरोपीच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश सय्यद वहाब यांनी पोलीस कोठडी नाकारुन न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

न्यायाधीशांनी चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपींच्या वकीलानी १४ मे रोजी जामीनासाठी अर्ज केला होता पण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आपले मत मांडण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागीतला होता. त्यानुसार त्यांनी १५ मे रोजी आपले मत मांडले. सरकारची बाजू मांडतांना सरकारी वकील आर.जे. वसमते यांनी या धान्य घोटाळ्यातील इंडिया मेगा अनाज अँग्रो कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडीया, शासकीय धान्याचे वाहतूक ठेकेदार राजु पारसेवार व हिंगोलीचे ललितराज खुराणा हे मुख्य आरोपी असून या धान्य घोटाळ्याचा कट त्यांनीच रचला आहे व ते बडे प्रस्त आहेत. त्यांना जामीन दिल्यास ते साक्षीदारावर दबाव आणू शकतात, विदेशात पळून जावू शकतात, पुरावे नष्ट करु शकतात त्यामुळे त्यांना जामीन देवू नये अशी विनंती न्यायालयाला केली.

यावेळी आरोपींच्या वकीलानी या घोटाळ्याचा पूर्ण तपास झालेला आहे, सर्वच कागदपत्रे त्यांच्याच ताब्यात आहेत, त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना जामीन देण्याची विनंती केली. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जामीनावर निर्णय घेण्यास एक दिवसाचा वेळ मागून घेतला आणि गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय देणार असल्याचे सांगितले.

काल १५ मे रोजी झालेल्या युक्तिवादानंतर जामीन मिळेल अशी अटकळ बांधण्यात येत होती पण गुरुवारी सकाळी न्यायाधिश सय्यद अब्दुल वहाब यांनी दिली. दिर्घवेळ विचारमंथन करुन दुपारी ३ वाजताच्या दरम्यान सर्व आरोपींना जामीन नाकरला. न्यायालयाच्या या निर्णयाने धान्य घोटाळ्यातील आरोपींना जोरदार चपराक बसली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या