
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडून आलेल्या आमदार खासदारांना वकिली करण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केली आहे. त्यामुळे आमदार-खासदारांना मोठा दिलासा मिळाला असून पेशानं वकील असलेले उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर देखील ते आपली वकिली सुरू ठेवू शकतात, हे आता स्पष्ट झालं आहे.
भाजपचे नेते अॅड. अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. पेशान वकील असलेल्या उमेदवारांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात वकिलीची प्रॅक्टीस करण्यापासून रोखावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली होती. त्यावर केंद्राकडून देखील भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. आमदार-खासदार हे लोकांनी निवडून दिलेले उमेदवार असतात आणि ते काही सरकारचे पूर्णवेळ काम करणारे कर्मचारी नाहीत, तेव्हा यावरील निर्णय राखून ठेवण्याचे कारण नाही असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज ही याचिका रद्द केली. यामुळे आता काळाकोटवाल्या आमदार-खासदारांना निवडून आल्यानंतर देखील वकिली करता येणार आहे.
Supreme Court has dismissed the petition seeking ban on legislators from practicing as lawyers. pic.twitter.com/w1rij14Lk3
— ANI (@ANI) September 25, 2018



























































