
सामना प्रतिनिधी । मुंबई
आपली कलाकृती बिनधास्त प्रेक्षकांपुढे मांडण्याचे स्वातंत्र्य सध्या वेब सीरिजच्या माध्यमातून मिळत आहे. काय पाहायचे किंवा काय नाही हे प्रेक्षकांना ठरवू द्या. उगाच वेब सीरिजवर सेन्सॉरचे बंधन नको, असे मत अभिनेता, दिग्दर्शक श्रेयस तळपदे याने व्यक्त केले. लवकरच तो ‘बेबी कम ना’ या केब सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यानिमित्त श्रेयसशी केलेली बातचित…
ऑल्ट बालाजीवरील ‘बेबी कम ना’ ही अॅडल्ट कॉमेडी वेब सीरिज पारितोष पेंटर्स यांच्या हिंदी आणि इंग्लिश भाषेतील ‘डबल ट्रबल’ या नाटकावर आधारित आहे. यात श्रेयस तळपदे, चंकी पांडे आणि किकू शारदा, शेफाली जरीवाला, मानसी स्कॉट, नीता शेट्टी आणि राजेंद्र चावला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आपल्या भूमिकेविषयी श्रेयस म्हणाला, यात मी आदी नावाची भूमिका साकारतोय. एकाच वेळी तो दोन मुलींना डेटिंग करतो. पुढे तो कसा अडचणीत सापडतो, त्याची कशी तारांबळ उडते हे यात पाहायला मिळेल. वेब सीरिजमध्ये माझी तारांबळ उडत असली तरी तुमचे मात्र 100 टक्के मनोरंजन होणार हे मात्र नक्की.
वेब सीरिज हे नवीन माध्यम आहे. ज्या गोष्टी सिनेमा, मालिकांमधून दाखवू शकत नाही, त्या आपण या माध्यमातून प्रेक्षकांपुढे सादर करू शकतो. नवनवीन प्रयोग करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. याच कारणामुळे या माध्यमाकडे आकर्षित झाल्याचे श्रेयस सांगतो. वेब सीरिजवर सेन्सॉरचे बंधन नको, असे मतही त्याने क्यक्त केले. तो म्हणाला की, कलाकार, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मला जे काही काटते ते बिनधास्तपणे प्रेक्षकांपुढे मांडण्यासाठी वेब सीरिजसारखा प्लॅटफॉर्म गरजेचा आहे. काय पाहायचे किंवा काय नाही हे प्रेक्षकांना ठरवू द्या.
गॉडफादरची गरज नाही
बॉलीवूडमध्ये चांगले काम मिळवायचे असेल तर गॉडफादरची गरज असते असे म्हटले जाते. मात्र श्रेयसने कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याबाबत तो म्हणाला, इंडस्ट्रीत गॉडफादर असता तर कदाचित मला आणखी चांगल्या ऑफर्स मिळाल्या असत्या. काही सिनेमे स्वीकारण्याची चूक टाळता आली असती, परंतु गॉडफादर नसल्याने मी स्वतःहून जास्त लोकांना भेटलो. सिनेमे मिळवण्यासाठी मेहनत घेतली. आज स्वतःच्या कर्तृत्वावर मिळालेले यश पाहिल्यावर खूप समाधान वाटते.
‘मी टू’ ला पाठिंबा
‘मी टू’ कॅम्पेनमुळे इंडस्ट्रीतली काळी बाजू जगासमोर आली. इंडस्ट्रीत असे 20 ते 25 टक्के लोक आहेत, ज्यांच्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीचे नाव खराब होते. या कॅम्पेनमुळे अशा लोकांना नक्कीच आळा बसेल, यापुढे असे कृत्य करायला घाबरतील, असे तो सांगतो.

























































