केजरीवालांचा शपथविधी दिल्लीकरांसाठी; इतर राज्यांतील मुख्यमंत्री, नेत्यांना निमंत्रण नाही

1299

‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल हे येत्या रविवारी तिसर्‍यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. रामलीला मैदानावरील या सोहळ्याचे इतर राज्यांतील मुख्यमंत्री किंवा नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. केवळ दिल्लीकरांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडेल असे ‘आप’च्या दिल्ली युनिटचे निमंत्रक गोपाल राय यांनी गुरुवारी सांगितले.

केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा दिल्लीच्या सर्वसामान्य जनतेसाठी खुला असल्याचे माजी उपमुख्यमंत्री व ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी बुधवारी जाहीर केले होते. आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांची हिंमत वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून रामलीला मैदानावर या असे आवाहन करणारे ट्विट सिसोदिया यांनी केले होते. त्यानंतर गुरुवारी ‘आप’चे दिल्ली युनिट निमंत्रक गोपाल राय यांनी सोहळ्याला इतर राज्यांतील नेतेमंडळीला बोलावले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. केजरीवाल हे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेल्या दिल्लीकरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे राय म्हणाले.

मनोज तिवारींची दोन तास झाडाझडती

दिल्लीत पराभवाचा जोरदार दणका बसलेल्या भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांची दोन तासांहून अधिक वेळ झाडाझडती घेतली. प्रचाराला बड्या नेत्यांची फौज जुंपूनही आपण हरलोच कसे यावर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. या वेळी पक्षाचे सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष यांच्यासह सर्वच सरचिटणीस हजर होते. नड्डा यांनी बुधवारीही दिल्ली पराभवाबाबत पक्षाच्या सरचिटणीसांसोबत बैठक घेतली होती.

मफलरधारी छोटू असणार खास पाहुणा

केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला मफलरधारी एक वर्षाचा छोटू खास पाहुणा असेल असे ‘आप’च्याच ट्विटर हँडलवरून गुरुवारी जाहीर करण्यात आले. ‘आप’चा प्रचार करणारी गांधी टोपी, तपकिरी रंगाचे स्वेटर, गळ्याभोवती काळ्या रंगाचे मफलर, डोळ्यांवर जाड फ्रेमचा चष्मा आणि मिशीतील हा छोटू निकालाच्या दिवशी चर्चेचा विषय ठरला होता.

सरकारी शाळांच्या विकासासाठी ‘आप’चे कालबद्ध अभियान

दिल्ली विधानसभेवर पुन्हा सत्ता मिळवलेल्या ‘आप’चे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी सरकारी शाळांच्या विकासासाठी ‘कालबद्ध अभियाना’वर भर दिला. किंबहुना केंद्र सरकारसह सर्वच राज्यांनी सरकारी शाळांमध्ये सुविधा तसेच त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विविध राज्यांतील सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. या शाळा बंद करणे म्हणजे देशाच्या विकासमार्गात अडथळा निर्माण करणे ठरेल असे सिसोदिया म्हणाले. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये दिल्लीच्या धर्तीवर शाळांचा विकास केला जाईल असा दावा ‘आप’च्या राजस्थान युनिटने ट्विटद्वारे केला. त्यावर मनीष सिसोदिया यांनी आपले मत नोंदवले.

आपली प्रतिक्रिया द्या