देशात कोळशाचा तुटवडा नाही, वीज निर्मिती सुरळीत सुरू; कोळसा मंत्रालयाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार कस्सी यांनी बुधवारी देशात कोळशाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत वीज निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत असल्याचे म्हटले आहे. ANI च्या वृत्तानुसार, “देशात खाणी, वीज प्रकल्प, बंदरे आणि वाहतूक केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जो ग्राहकांना अगदी कमी वेळेत उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.”

कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार कस्सी म्हणाले की, “वीज निर्मितीमध्ये कोणतीही अडचण नाही. वीज निर्मितीच्या बाबतीत कोळशाची अजिबात तूट नाही. आम्ही वापराच्या पातळीनुसार कोळशाचे उत्पादन करत आहोत.”

कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये व्यावसायिक आणि कॅप्टिव्ह मायनिंगच्या माध्यमातून कोळसा उत्पादन आणि पुरवठ्याने २०० दशलक्ष टनाचा टप्पा ओलांडला आहे. या वर्षात व्यावसायिक आणि कॅप्टिव्ह खाणींमधून २१०.४६ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले असून, मागील वर्षाच्या १९०.९५ दशलक्ष टनाच्या तुलनेत यामध्ये १० टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच कोळसा पुरवठ्यात ७.३५ टक्क्यांची वाढ होऊन तो २०४.६१ दशलक्ष टनांवर पोहोचला आहे.