माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल

442

माजलगाव येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस नगर परिषदेतील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी अटक झाली होती. बुधवारी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात 24 पैकी 19 नगरसेवकांनी आज बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

माजलगाव नगर परिषदेतील भ्रष्टाचार प्रकरणी सहाल चाऊस मागील दोन महिन्यांपासून अटकेत आहेत. सहाल चाऊस हे भाजपा व मोहन जगताप यांच्या माजलगाव जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष आहेत. मागील अनेक वर्षापासून नगर परिषदेत त्यांचा एककल्ली कार्यक्रम सुरु असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. याविरोधात नगर विकास मंत्रालयातही अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये चाऊस नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते.

मागील काही दिवसापासून नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यात आलेल्या निधी व इतर कारणावरून वाद होत होता. नगरसेवक हे यापुर्वीही नगरपालिका बरखास्त करावी म्हणून वरिष्ठांशी पत्रव्यवहार करत होते. यातच मागील दोन महिन्यापुर्वी  नगरअध्यक्षासह 3 मुख्याधिकारी व लेखापाल यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना 4 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मागील दोन महिन्यापासून ते न्यायालयीन कोठडीतच आहेत. याचा फायदा विरोधक आ.प्रकाश सोळंके यांनी माजलगाव नगरपरषिदेचे नगराध्यक्षासह एकही नगरसेवक आलेला निधी खर्च केला नसल्याने हा निधी तसाच पडून असल्याने तो  सार्वजनिक बांधकामा विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. बुधवारी  दुपारी 2 च्या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समक्ष उपस्थित 19 नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेत अविश्वास प्रस्ताव नगराध्यक्षाच्या विरोधात दाखल करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या