रोहित-विराटमध्ये मतभेद नाहीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत

308

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. यानंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अपयशाला कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामधील मतभेद जबाबदार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून येऊ लागले. टीम इंडियाला सोडून रोहित शर्मा आपल्या कुटुंबासमवेत मायदेशात परतल्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला. मात्र मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली व रोहित शर्मा या दोन सीनियर खेळाडूंमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे मत मंगळवारी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले, प्रत्येक खेळाडूचे विचार भिन्न असू शकतात, पण याचा अर्थ मतभेद आहेत असा होऊ शकत नाही.

टीम इंडियामध्ये 15 खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने विचार करतो. आम्ही सर्व बाबींचा विचार करून त्यानंतर अंतिम निर्णय घेतो. एखाद्या वेळेस ज्युनियर खेळाडूकडून आलेली कल्पनाही चांगली असू शकते. तिचा अवलंब केला जाऊ शकतो. म्हणून काय याला मतभेद म्हणत नाहीत, असे रवी शास्त्री पुढे स्पष्ट म्हणाले.

त्याने पाच शतके झळकावली नसती

रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये पाच शतके झळकावत हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामध्ये सर्व काही सुरळीत नसते तर त्याने पाच शतके झळकावली असती का, असा सवाल रवी शास्त्र्ााr यांनी पुढे केला आहे. विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली होती. मतभेद असते तर त्याच्या फलंदाजीवरही फरक पडला असता, असेही त्यांनी पुढे सांगितले.

वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलियाप्रमाणे राज्य करायचेय

वेस्ट इंडीजने 80 च्या दशकात, ऑस्ट्रेलियाने 90 च्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवले. आता हिंदुस्थानचा संघ याची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या पाच वर्षांमध्ये टीम इंडियाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कात टाकलीय. भविष्यातही विजयाचा सिलसिला सुरू ठेवायचाय, असे रवी शास्त्री पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या