
यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातही अपेक्षेइतका आंबा बाजारात आला नाही. आंब्याचे दरही गगनाला भिडलेले आहेत. परदेशातूनही आंब्याला मोठी मागणी आहे. मात्र आंबा उपलब्ध नसल्याने परदेशातील खवय्यांनाही हापूसची प्रतिक्षा आहे. दर 30 ते 40 टन आंबा निर्यात करणाऱ्या पणन मंडळाकडून यंदा आंब्याची एकही पेटी परदेशात गेलेली नाही. कॅनडातून मोठ्या प्रमाणात मागणी असूनही आंब्याच्या तुटवड्यामुळे अद्यापही आंब्याची निर्यात झालेली नाही.
पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च महिन्यात बाजारात आला. मात्र दुसऱ्या टप्यातील आंब्यासाठी खवय्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे. अवकाळी पाऊस आणि प्रखर उन्हामुळे दुसऱ्या टप्यातील मोहोराला फळ लागवड झाली नाही. त्यामुळे मार्चनंतर बाजारात आंबा आलेला नाही. अजून दहाबारा दिवस आंब्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
रत्नागिरीतील पणन मंडळाकडून दरवर्षी 30 ते 40 टन आंबा परदेशात निर्यात होतो. यंदा मात्र आंब्याची एकही पेटी परदेशात गेलेली नाही. मात्र आंबा उपलब्ध होताच आंब्याच्या परदेशगमनाला लवकरच मुहूर्त मिळेल. कॅनडाकडून दोन टन आंब्याची मागणी आली होती. मात्र, आंबाच उपलब्ध नसल्यामुळे ही मागणी पूर्ण करता आली नाही. रत्नागिरीतून अमेरिकेतही अद्याप आंबा पोहोचलेला नाही.
अमेरिकेतून तपासणी प्रतिनिधी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. अमेरिकेत आंबा पाठवण्यापूर्वी हे तपासणी प्रतिनिधी रत्नागिरीत येतात. तीन महिने मुक्काम करतात. आंब्याच्या सर्व तपासण्या करून ते आंब्याचा अहवाल पाठवतात आणि त्यानंतरच रत्नागिरीच्या हापूस आंब्याची अमेरिकेत निर्यात होते. रत्नागिरीचा हापूस अमेरिकेला जाण्यापूर्वी विविध चाचण्यांचे दिव्य पार करतो. यंदा या चाचण्या पार पडलेल्या आहेत. आता प्रतिक्षा आहे ती यंदा अमेरिकेला आंबा निर्यात होण्याची. रत्नागिरीतून वाशी मार्केटच्या माध्यमातून जपानला आंबा निर्यात झाला आहे. मात्र पणन मंडळाकडून अद्याप आंबा निर्यात झालेला नाही.

























































