रेल्वेकडे स्वत:चे अग्निशमन दल नाही, पालिकेच्या अग्निबंबांवरच मदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाचा तडाखा जसा वाढत चालला आहे तसा रुळाशेजारील वाळलेल्या गवताला तसेच कचऱयाला आग लागणे तसेच रेल्वेच्या डब्यांमधून ज्वलनशील पदार्थांची बेकायदा वाहतूक तसेच एसी रिपेअरिंग करणाऱया कर्मचाऱयांकडून सिलिंडरची वाहतूक करणे असे प्रकार होत असून त्यावर रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. आगीशी सामना करण्यासाठी रेल्वेकडे स्वतःचे अग्निशमन दलही नसल्याने चिंता वाढली आहे.

काही महिन्यांपूर्वी चर्चगेट स्थानकाच्या इमारत परिसरातील बेवारस लाकडांच्या साठय़ाला आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या गाडय़ांनी ही आग वेळेत विझवली, अन्यथा अनर्थ घडला असता. नुकतेच खारकोपर येथे रुळांशेजारच्या वाढलेल्या गवताला आग लागल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला होता. अशा घटना अधूनमधून घडतच आहेत. नुकतेच इगतपुरीला तर कांद्याची वाहतूक करणाऱया रेल्वे डब्यातील कांदे काढता येईना म्हणून एका महिलेने त्या गोणीलाच आग लावल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला होता. हार्बर मार्गावर तर रुळांवरील कचऱयाच्या ढिगाला आग लागून सिग्नलच्या केबल जळाल्याच्या घटना घडल्या आहेत.

लोकल मोटरमनच्या केबिनमध्ये पुढे आणि मागे अग्निशमन उपकरणे ठेवलेली असतात. त्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. रेल्वेच्या महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये फायर अलार्म आणि आग आपोआप विझण्याची यंत्रणा आहे. मात्र, मोठय़ा आगीच्या घटनांवेळी पालिकेच्या अग्निशमन दलालाच पाचारण करावे लागते असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

लंडनचा बंब हेरिटेज गॅलरीमध्ये…
ब्रिटिशांच्या काळात मात्र ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (जीआयपीआर) पंपनीची लंडनवरून आणलेला वाफेवर चालणारा अग्निबंब रेल्वेच्या दिमतीला होता. या अग्निबंबांतून जोराने पाण्याचा फवारा आगीवर उडविला जात असे. या बंबांचे जतन मध्य रेल्वेच्या हेरिटेज गॅलरीमध्ये केले आहे. परंतु त्यातून रेल्वेच्या अधिकाऱयांनी काही धडा घेतलेला नसल्याचे म्हटले जात आहे.