1 जून ते 15 ऑगस्ट मासेमारीबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पावसाळ्यात 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीला बंदी आहे. परंतु 15 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत समुद्रात मोठी वादळे येतात. तसेच या कालावधित धार्मिक मच्छीमार बांधव नारळीपौर्णिमा साजरी करतात. त्यामुळे या मासेमारी बंदीचा कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानुसार येत्या तीन दिवसांत याबाबतचे परिपत्रकच काढण्याचे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी दिले आहे.

या प्रकरणी मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी 12 जून रोजीच मत्स्य व्यवसाय प्रधान सचिव अनुपकुमार यांना लेखी पत्र दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने अनुपकुमार यांची भेट घेतली. मात्र अनुपकुमार यांनी आपल्याला याबाबतचे पत्रच प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर या प्रकरणी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल, सरचिटणीस संजय कोळी, मुंबई जिल्हाध्यक्ष दिगंबर वैती, मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष मार्शल कोळी, पालघर जिल्हा उपाध्यक्ष महादेव निजाई आदी उपस्थित होते.

प्रधान सचिवांची बदली करण्याची मागणी

मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांची बदली करण्याची मागणीही कृती समितीने या वेळी केली. पर्ससीन जाळ्याने आणि एल.ई.डी. लाईटने बेकायदेशीररीत्या अडीच हजार मच्छीमार मासेमारी करतात. या भांडवलदार मच्छीमारांकडून अनुपकुमार यांनी करोडोंचा मलिदा खाल्याचा मच्छीमारांचा आणि कृती समितीचा आरोप आहे. त्यांची त्वरित बदली करण्याबाबतचे निवेदन कृती समितीने जानकर यांना दिले.