
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला देण्यासाठी महायुती सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. दुसरीकडे आठ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱया मंत्र्यांच्या बंगल्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या रवी भवन येथील बंगल्यावर तब्बल 1 कोटी 4 लाखांची उधळपट्टी केली जाणार आहे.
राज्य आर्थिक संकटात असल्याने एका विभागाचा निधी दुसऱ्या विभागाच्या योजनेसाठी वळविला जात आहे. पूरग्रस्त शेतकऱयांना सरकारने घोषीत केलेली मदत देण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. या अशा परिस्थितही रवी भवन येथील विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या नऊ नंबरच्या बंगल्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. यासाठी 30 टक्के कमी दराने निविदा भरण्यात आली असून कामही सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने एका बंगल्यावर तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अधिवेशनाच्या तयारीच्या निमित्ताने मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी कोटय़वधींचा खर्च का, असा सवाल सर्वसामान्यांकडून केला जात आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 100 कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 100 कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. विधान भवन, रवी भवन, नागभवन, देवगिरी, रामगिरी, राजभवन तसेच 150हून अधिक गाळ्यांची देखभाल-दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध करून काही कामेही सुरू झाली आहेत.



























































