
सामना प्रतिनिधी, मुंबई
महानिर्मितीच्या राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पांना सध्या पावसाळा असूनही कोळशाचे टेन्शन नाही. महानिर्मितीकडे सध्या 11 लाख मेट्रिक टन एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे. आजची विजेची मागणी पाहता या कोळशावर 15-20 दिवस वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे पावसामुळे कोळसा पुरवठय़ाबाबत आणीबाणीची परिस्थिती आली तरी त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होणार नाही.
पावसाळय़ात कोळसा खाणींमध्ये पाणी शिरल्याने किंवा रेल्वे वाहतुकीला फटका बसल्यास त्याचा कोळसा पुरवठय़ावर परिणाम होऊन वीजनिर्मिती ठप्प होते. त्याची दखल घेत महानिर्मितीने यंदा पावसाळय़ापूर्वीच सर्वच औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा मुबलक साठा करून ठेवला आहे. त्यामुळे पावसाचा कोळसा वाहतुकीवर परिणाम झाली तरी वीजनिर्मितीमध्ये कोणताही खंड पडणार नसल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे. महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांना लागणारा कोळसा दररोज रेल्वेच्या माध्यमातून वाहून आणला जातो. तोच कोळसा वीजनिर्मितीसाठी वापरला जातो. त्यामुळे वीज केंद्रांमध्ये सध्या असलेला कोळशाचा साठा आणीबाणीच्या वेळी वापरता येणार आहे.
कोळसा भिजू नये म्हणून चोख व्यवस्था
महानिर्मिती सध्या दररोज येणाऱया कोळशाचा वीजनिर्मितीसाठी वापर करीत आहे. तर स्टॉकमध्ये असलेला 11 लाख मेट्रिक टन कोळसा पावसात भिजू नये म्हणून ताडपत्रींच्या सहाय्याने झाकला आहे. तसेच सदर कोळसा कोल मिलपर्यंत नेण्यासाठी शेड उभारली आहे.
वीज प्रकल्प उपलब्ध कोळसा
कोराडी 2 लाख 13 हजार मेट्रिक टन
भुसावळ 1 लाख 85 हजार मेट्रिक टन
पारस 42 हजार मेट्रिक टन
खापरखेडा 1 लाख 34 हजार मेट्रिक टन
नाशिक 38 हजार मेट्रिक टन
चंद्रपूर 2 लाख 25 हजार मेट्रिक टन
परळी 2 लाख 39 हजार मेट्रिक टन



























































