आठवडाभर लोडशेडिंग होणार नाही!

198

राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी यंदा खर्‍या अर्थाने प्रकाशमान होणार आहे. ऐन दिवाळीत नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागू नये म्हणून महावितरणने आठवडाभर राज्यभरात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कुठेही भारनियमन करू नये, तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास तत्काळ पूर्ववत करावा असे निर्देश दिले आहेत.

महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यामध्ये तब्बल 1 कोटी 80 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये चक्रावार पद्धतीने भारनियमन केले जाते. त्याचा इतर ग्राहकांबरोबरच घरगुती ग्राहकांनाही फटका बसतो. दिवाळीनिमित्त घराघरात विद्युत रोषणाई केली जाते, अकाश कंदील लावले जातात, मात्र याच काळात वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांच्या आनंदावर विरजन पडते. त्याची दखल घेत महावितरणने दिवाळीच्या काळात आठवडाभर वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वीज वाहिन्यांच्या लगत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, रोहित्रांची देखभाल करणे आदी कामे करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता दिवाळीत अखंडित मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

अधिकार्‍यांचा मुक्काम कार्यालयातच

दिवाळीच्या काळात तांत्रिक वारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास तो तत्काळ पूर्ववत करता यावा म्हणून विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, शाखा अधिकार्‍यांना कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सक्षम अधिकार्‍याच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडू नये असेही बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या