
देशात डिजिटल टोलला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) येत्या 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय राजमार्गांवरील टोल नाक्यावर कॅशचा व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात आहे. टोल भरण्यासाठी वाहनधारकांना कॅशऐवजी केवळ फास्टॅग आणि यूपीआय यासारख्या डिजिटल माध्यमाचा वापर करणार आहे. डिजिटल करण्यामागचा उद्देश हा टोल ऑपरेशन्स अधिक पारदर्शक आणि चांगला बनवणे हा आहे, असे एनएचएआयचा प्रयत्न आहे. देशात सध्या 1 हजार 150 टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन सिस्टम लागू आहे.
देशातील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून होत असलेल्या कॅश पेमेंटमुळे अनेक वेळा वाहतूक काेंडीची परिस्थिती निर्माण होते. सकाळी किंवा संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी तर रोख व्यवहारांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. कधी कधी सुटय़ा पैशांवरूनही टोल नाक्यावरील कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद होतो. त्यामुळे टोल नाक्यावर डिजिटल पेमेंट आणण्याचे ठरवले आहे. जर टोल नाक्यावर डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू झाली तर या समस्या होणार नाहीत, असे एनएचएआयला वाटत आहे. देशात सध्या फास्टॅगचा वापर वेगाने वाढला आहे. जारी झालेल्या आकडेवारीनुसार, 98 टक्के वाहनांमध्ये फास्टॅग लावलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमानुसार, जर एखादे वाहन ऑक्टिव्ह फास्टॅगशिवाय टोल प्लाझाच्या फास्टॅग लेनमध्ये गेले आणि रोखीने पैसे भरल्यास त्या वाहनधारकाकडून दुप्पट टोल वसूल केला जातो.
1150 टोल नाक्यावर सिस्टम
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने देशातील 1150 हून अधिक टोल नाक्यावर तसेच एक्सप्रेसवेवर नवीन सिस्टम आणण्याचे ठरवले आहे. टोलसाठी आता पॅश चालणार नाही. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होईल. यानंतर व्यवस्थापनात पारदर्शकता येईल. तसेच राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कला टेक्नोलॉजीशी जोडले जाईल.

























































