
सामना ऑनलाईन | मॉस्को
रशियात सार्वजनिक ठिकाणी दारू पार्ट्यांना बंदी आहे. फिफा विश्वचषकासाठी जगभरातील फुटबॉल चाहते देशात येणार हे लक्षात ठेऊन रशियन सरकारने हिीबंदी शिथिल केली होती. परंतू विश्वचषक संपल्यावर मात्र रशियन नागरिकांना अशा खुल्लमखुल्ला दारू पार्ट्यांवरील बंदी पुन्हा लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
२१ व्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत यजमान रशियाने स्पेनला पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन रशियन नागरिकांनीही जागोजागी खुल्या ओल्या पार्ट्या आयोजित करून मनमुराद आनंद लुटला. रशियन पोलिसांनीही या धांगडधिंग्याकडे कानाडोळा केला. ओपन एअर ड्रिंकिंग पार्ट्यांचा हा नजारा विश्वचषकानंतर मात्र मुळीच खपवून घेतला जाणार नाही असे पोलिसांनी जाहीर केले आहे.
एका रशियन ब्लॉगरशी बोलताना मॉस्कोच्या पोलीस अधिकाऱ्यांनी खुल्या मद्य पार्ट्यांवरील बंदीचे संकेत दिले. वर्ल्डकपनंतर सार्वजनिक स्थळी बिअर पिता येईल का? असा प्रश्न ब्लॉगरने केला असता तो अधिकारी उत्तरला तुम्ही रशियन असाल तर त्यासाठी परवानगी नक्कीच मिळणार नाही.

























































