
अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातासाठी वैमानिकाला दोषी ठरविले जाऊ शकत नाही. तुम्ही मनावर ओझे ठेवू नका, अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या अपघातात मरण पावलेले वैमानिक सुमित सभरवाल यांच्या 91 वर्षीय पित्याला धीर दिला आहे. सुमित यांचे वडील पुष्कर राज सभरवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, प्राथमिक अहवालात वैमानिकाच्या विरोधात कोणताही आरोप ठेवलेला नाही.
अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी पुष्कर यांनी केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकार आणि ‘डीजीसीए’कडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने म्हटले की, ‘एएआयबी’ च्या अहवालात केवळ 2 वैमानिकांमद्धे झालेल्या संवादाचा उल्लेख आहे. भविष्यातील अपघात रोखणे, हा या तपासचा हेतु आहे. गरज भासल्यास आम्हीच स्पष्ट करू की, वैमानिकांना दोषी ठरविले जाऊ शकत नाही. सोमवारी याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. या विमान अपघातात दोन्ही वैमानिकांसह 260 जणांचा मृत्यू जल होता.
विदेशी माध्यमांना हिंदुस्थानाची बदनामी हवी होती
विमान अपघात वैमानिकाच्या चुकीने झाल्याचा दावा वॉल स्ट्रीट जरनलने एक बातमीत केला होता, असही माहिती पुष्कर यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, विदेशी माध्यमांनी अतिशय वाईट पद्धतीने बातम्या दिल्या. त्यांचा एकाच हेतु होता, तो म्हणजे हिंदुस्थानाची बदनामी. मात्र, अशा बातम्या हिंदुस्थानातील न्यायव्यवस्थेला प्रभावित करू शकणार नाहीत.





























































