
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंवरुनच हिंदुस्थानने किती विनाश केला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानात अनेक ठिकाणी विध्वंसाची दृश्ये दिसत आहेत. एवढेच नाही तर लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत. आता या स्ट्राइकद्वारे पाकिस्तानला कल्पना केली नसेल असेच उत्तर दिले गेले आहे.
जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 16 व्या दिवशी हिंदुस्थानने अखेर बदला घेतला. हिंदुस्थानी हवाई दलाने रात्री उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. याअंतर्गत हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले. याकरता ड्रोन आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून 9 तळ निश्चित केले आणि तब्बल 24 हल्ले करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
पहलगाम हल्ल्याला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले आहे की, यावेळी कोणीही पुरावे मागणार नाही. पाकिस्तानमधील बरेच लोक प्रत्यक्षदर्शी या आपरेशनचे प्रत्यक्षदर्शी आहेत. मंगळवारी मध्यरात्री 1.30 सुमारास हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत बहावलपूर, मुरीदके, बाग, गुलपूर, सवाई, बिलाल, बर्नाला, महमूना कोटली आणि मुझफ्फराबाद येथे हल्ले केले. ही तीच ठिकाणे आहेत जिथून हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानमधील फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला केला आहे. हा हल्ला करुन दहशतवादी अझहर मसूद आणि हाफिज सईद यांना हिंदुस्थानने मोठा धक्का दिला आणि त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, हिंदुस्थानने 24 क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही हिंदुस्थानने हल्ला केल्याचे आणि क्षेपणास्त्रे डागल्याचे मान्य केले आहे.