
सामना ऑनलाईन,मुंबई
राज्यात विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच प्रदीर्घ कालावधीसाठी विरोधी पक्षनेतेपद रिक्त असून येत्या 17 जूनपासून सुरू होणारे विधिमंडळ अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना चालवण्याची नामुष्की विरोधकांवर आली आहे. राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वावर सोपवण्याचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला पण लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अजून सावरलेली नसल्याने विरोधी पक्षनेत्याची निवड अजून होऊ शकलेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्तच आहे. या रिक्त पदावर विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी मागील आठवडय़ात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती पण विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याचे अधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आल्याने अजूनही विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना चालवण्याची वेळ विरोधकांवर आली आहे.
गाशा गुंडाळला
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे. विखे-पाटील यांनी कार्यालयातील स्वीय सहाय्यकांनाही कामाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी दावा करणार नाही
काँग्रेसने अजूनही विरोध पक्षनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार नाही. शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेतेपदावर दावा आपण करायचा नाही असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केला.
येत्या 17 जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 18 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, पण विरोधी पक्षनेता अजूनही निवडलेला नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदाच्या नावाची घोषणा होईल असे सांगण्यात येते.
लवकरच प्रवेश
मागील आठवडय़ात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांतच राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगण्यात येते.





























































