
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर जिल्ह्यातील रास्तभाव दुकानातून धान्य विक्री बंद आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे दुकानदारांना मालाची विक्री करता येत नाही. सर्वसामान्य नागरिक दुकानदारांशी भांडण करत असल्याने अनेक दुकानदारांनी दुकान बंद ठेवण्याचा पर्याय निवडला आहे.
रास्त भाव दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचा ऑनलाइन अंगठा घेऊन त्यास धान्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र दोन दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्याच्या कारणावरून दुकानदारांना मालाची विक्री करता येत नाही. दुकानात धान्य असतानाही दुकानदार धान्य देत नसल्यामुळे नागरिकांच्या रोषास दुकानदारा सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन सर्वर बंद असल्यामुळे ग्राहकांना दुकानातून वारंवार परत जावे लागत आहे. सर्वर केव्हा चालू होईल याची दुकानदारानाही माहिती नाही. त्यामुळे काही दुकानदारांनी थेट दुकान बंद ठेवण्याचा पर्याय निवडला.


























































