
सिनेट निवडणुकीत झालेली पदवीधर मतदारांची नोंदणी रद्द करून राज्य सरकारच्या हिटलरशाहीला बळी पडलेल्या मुंबई विद्यापीठाने मतदारांची नव्याने नोंदणी करण्याचा घाट घातला, मात्र सुशिक्षित पदवीधर मतदारांनी नव्याने मतदार नोंदणी करण्यास प्रतिसादच दिलेला नाही. 30 ऑक्टोबरपासून पदवीधर मतदारांची नव्याने नावनोंदणी करण्यास सुरुवात झाली, मात्र मागील 20 दिवसांत सुमारे 1500 मतदारांनीच नोंदणी केली आहे. यातील सुमारे 1200 जण हे आधीच्या नोंदणीतील मतदार असून 300 जणांनी प्रथमच मतदार म्हणून नोंदणी पूर्ण केली आहे.
राजकीय हस्तक्षेपाला बळी पडून सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम मुंबई विद्यापीठाने जाहीर केला. सिनेट निवडणुकीसंदर्भात नेमलेल्या प्रा. आर. एस. माळी समितीने 2017 च्या एकसमान कायदे क्रमांक 2 च्या तरतुदीनुसार पदवीधरांची मतदार म्हणून नव्याने नावनोंदणी करण्याची शिफारस केली. त्यानुसार 25 ऑक्टोबरला पार पडलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पात्र आणि मतदार होऊ इच्छिणाऱयांकडून नव्याने अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाने पूर्वी 94 हजार 162 मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर केली होती व त्यातील काही अर्ज बाद झाले व बाद झालेले काही अर्ज स्वीकारले गेले. त्यामुळे अंतिम 90 हजार 224 मतदारांची यादी तयार झाली होती. ही यादीच रद्द करून नव्याने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र अवघे 9 दिवस शिल्लक असूनही पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणीसाठी प्रतिसादच दिलेला नसून आता 30 नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठासमोर मतदार नोंदणी पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
पदवीधर मतदार नोंदणी – 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज छाननी, आक्षेप, तात्पुरती मतदार यादी – 1 डिसेंबर ते 25 फेब्रुवारी
अंतिम मतदार यादी – 26 फेब्रुवारी.
मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या हिटलरशाही निर्णयाला एकप्रकारे सुशिक्षित पदवीधर मतदारांनी नाकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आधीच सुशिक्षित मतदार घाणेरडय़ा राजकारणाला पंटाळून मतदान करत नाही. 90-95 हजार मतदारांनी केलेली नोंदणी सरकारने रद्द करून एकप्रकारे त्यांचा अपमान केलेला आहे. आता पुन्हा नव्याने नोंदणी करण्यासाठी पदवीधर मतदार कसा प्रतिसाद देतील? सिनेट निवडणूक प्रक्रियाच रद्द करणाऱया सरकारला पदवीधर मतदार नक्कीच उत्तर देईल.



























































