
स्मार्टफोनमुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होतात. मुलांचे बालपण हरवते, यासाठी युरोपातील देश आयर्लंडमधील ग्रेस्टोन्स या शहराने पुढाकार घेत ‘नो स्मार्टफोन’ची मोहीम राबविली आहे. मुलांचे बालपण टिकवण्यासाठी 22 हजार लोक एकत्र आले असून त्यांनी ‘इट टेक्स ए व्हिलेज’ नावाच्या या आंदोलनाने तंत्रज्ञानाविरुद्ध एक सामूहिक भिंत उभी केली आहे. फोनऐवजी मुलांसाठी ‘युथ कॅफे’ आणि खेळाचे उपक्रम वाढवण्यात आले आहेत. सध्या या मोहिमेची जगभरात चर्चा होत आहे.
‘ग्रेस्टोन्स’ शहरात ‘फोन-फ्री बीच पार्टी’सारखे कार्यक्रम सुरू झाले आहेत. ग्रेस्टोन्सच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आता आयर्लंडमधील इतर शहरे कॉर्प आणि डब्लिननेही ‘नो स्मार्टफोन कोड’ स्वीकारला आहे. देशाच्या सीमेबाहेर ब्रिटन आणि स्पेनमधील बार्सिलोनामध्येही पालकांच्या गटांनी असेच उपक्रम सुरू केले आहेत. सेंट पॅट्रिक शाळेच्या मुख्याध्यापिका रॅचेल हार्पर यांनी पाहिले की, मुले वर्गात लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. त्यांना रात्रभर येणाऱ्या मेसेजेसमुळे त्रास होत होता. त्यांची झोप अपुरी होती आणि काही मुले तर ‘कॅलरी काऊंटिंग अॅप्स’मुळे ‘ईटिंग डिसऑर्डर’चे बळी ठरत होती. मुख्याध्यापिका रॅचेल हार्पर यांच्या मते, 8 प्राथमिक शाळांमधील 70 टक्के पालकांनी स्वेच्छेने ‘नो स्मार्टफोन’ कोडवर स्वाक्षरी केली आहे. आम्ही मुलांना मिडल स्कूलमध्ये जाण्यापूर्वी मोबाईल फोन देणार नाही. कारण आम्हाला मुलांना डिजिटल भविष्यासाठी तयार करायचे आहे, त्यात बुडवायचे नाही, असे काही पालकांनी सांगितले आहे.
करून दाखवले
आयर्लंडमध्ये गुगल, मेटा आणि अॅपलसारख्या दिग्गज कंपन्यांची युरोपीय मुख्यालये आहेत. या शहरात अवघ्या नऊ वर्षांच्या वयात मुलांना स्मार्टफोन मिळतो, परंतु याच शहरात ‘नो स्मार्टफोन’ची मोहीम राबवणे सोपे काम नाही, तरीही पालकांनी हे करून दाखवले आहे. उपपंतप्रधान सायमन हॅरीस हे स्वतः या शहराचे रहिवासी आहेत. त्यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.



























































