
सामना प्रतिनिधी । जेजुरी
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा यंदा भरणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवती अमावस्या ही येत्या सोमवारी म्हणजेच २८ ऑक्टोबरला आहे. मात्र, या अमावस्येच्या काळात सूर्यादय नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा सोमवती यात्रा भरणार की नाही याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थांच्या होती. सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून, मंगळवारी ९ ऑक्टोबर रोजी ९ वाजून २७ मिनिटांनी संपते. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने सोमवती यात्रा भरणार नाही, तसेच घटस्थापना बुधवारी असल्याने देवाचा पालखी सोहळाही काढता येणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सोमवती यात्रेच्या नियोजनासाठी जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिरात पालखी सोहळ्याचे मानकरी खांदेकरी व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन केले होते. पालखीसोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, रमेश राऊत, छबन कुदळे, अरुण खोमणे, सुरेंद्र नवगिरे, रवींद्र झगडे, नगरसेवक महेश दरेकर, शशिकांत सेवेकरी, देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत देवसंस्थानने घटनादुरुस्तीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज केला असून, सण, उत्सव गावाच्या परंपरा, मानकरी खांदेकरी यांचे हक्क कायम अबाधित ठेवावेत, तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच घटनादुरुस्त करावी, अशी मागणी केली, तर खंडोबाच्या घोड्याची पागा बांधण्यासाठी गडाच्या पायथ्याशी कडेपठार रस्त्यालगत संतोष खोमणे यांनी ५ गुंठे जागा देणार असल्याचे या बैठकीत जाहीर केले.
































































