वाहनचालकांच्या संयमाचा होतोय उद्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिजमोहन पाटील । पुणे

पुण्यात बेशिस्त वाहनचालकांची संख्या मोठी आहे. नो एण्ट्री, वन वे यांचे बोर्ड, झेब्रा कॉसिंग, सिग्नल तर केवळ शोभेसाठी लावले आहेत, असा त्यांचा समज आहे. एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे शहरात रस्त्याची कामे, पादचारी मार्गांचे रुंदीकरण, मेट्रो यामुळे वाहतूककोंडी होऊन इच्छितस्थळी जाण्यासाठी वेळ लागत असल्याने वाहनचालक वैतागले आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. असे असताना पोलिसांकडून वाहतूक नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरून शहरात जोरदार कारवाई केली जात आहे. त्यात हेल्मेटसक्तीचे भूत पुणेकरांच्या डोक्यावर आहे. यामुळे वाहनचालकांच्या संमयाचा उद्रेक होऊन भररस्त्यात वाहतूक पोलिसांशी हुज्जत, मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

पोलिसांनी दंडात्मक कारवाई करतानाच आता वाहनचालकांचे समुपदेशन करण्यावरही भर दिला आहे. यामध्ये नियमभंगामुळे होणारे अपघात, दंडाचा भुर्दंड, वाहतूक नियम पाळणे हे चांगल्या नागरिकाचे लक्षण आहे, असे समुपदेशनाचे डोस दिल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. या समुपदेशनामुळे अनेकांना कामधंदा सोडून शिवाजीनगर मुख्यालयात जावे लागत आहे. तेथे बराच वेळ मान्यवरांचे विचार ऐकून घ्यावे लागत आहेत. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या समुपदेशनवर्गात ६२५ बेशिस्त वाहनचालकांचे वाहतूक नियम आणि सुरक्षेबाबत समुपदेशन करण्यात आले. गडबडीमध्ये किंवा मुद्दाम नियमांचे उल्लंघन करून एकाद-दुसरा मिनिट वाचविण्याच्या नादात या वाहनचालकांना समुपदेशनवर्गात अर्धा दिवस घालवावा लागत आहे. त्यामुळे यात समुदपदेशनापेक्षा होणारा मानसिक त्रास जास्त आहे. समुपदेशनाने किती वाहनचालक सुधारतील, हे सांगता येणार नाही; पण दिवसभरातला प्रमुख वेळ येथे जात असल्याने नियमभंग करण्यापूर्वी वाहनचालक १० वेळा विचार करतील.

पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती केली आहे. सरकारी नोकरदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेला विरोध आणि ५०० रुपयांचा मोठा दंड यामुळे अनेकजण वैतागले आहेत. पुण्यातील रस्ते नीट नाहीत, गतिरोधक चुकीचे आहेत, वाहतूक पोलीस रस्त्यावर थांबण्यापेक्षा कोपऱ्यात थांबून पैसे वसूल करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. हा प्रकार आधी बंद करा, मगच हेल्मेटसक्ती लागू करा, हे पुणेकरांचे म्हणणे खरे आहे.

उदा. नेहरू रस्त्यावर जागोजागी भररस्त्यात थांबलेली वाहने, पादचारी मार्गावर पार्क केलेल्या दुचाकी, भंगारात पडलेल्या गाड्या, अतिक्रमण यांमुळे टिंबर मार्केटपासून ते नरपतगिरी चौकापर्यंत दिवसभर वाहतूककोंडी होते. या रस्त्यावरून ससूनकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही पटकन रस्ता मिळत नाही, अशी विदारक स्थिती आहे. पण या ठिकाणी वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत. पण समर्थ पोलीस ठाण्याच्या बाहेर पाच ते सहा वाहतूक पोलीस घोळक्याने वाहनचालकांवर कारवाई करीत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळते.

वाहतूक नियमन न करता अशा प्रकारे दंड वसूल करण्यावर पुणेकरांचा आक्षेप आहे. हे चित्र केवळ येथील आहे असे नाही, तर शहराच्या सर्वच भागांत पोलिसांकडून अशी कारवाई सुरू असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. वाहनचालक आणि पुणेकरांमधील संघर्ष वाढत चालल्याने पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. २०१७मध्ये पुण्यात १६ घटना घडल्या होत्या; पण २०१८मध्ये नोव्हेंबरअखेरपर्यंत २६ घटना झाल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन-चार महिन्यांत हे प्रसंग वाढले आहेत. यामध्ये पुरुष वाहतूक पोलीस नाही, तर महिला वाहतूक पोलिसांना महिलांनीच भररस्त्यात मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. हा संघर्ष वाढणे योग्य नाही. पोलिसांकडून नियमांची सक्ती केली जात असताना, नागरिकांशी व्यवस्थित बोलणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे; अन्यथा भविष्यात हा संघर्ष आणखी वाढू शकतो.

श्रीमंतीच्या गर्वामुळे येरवड्यात मुक्काम
ह लाखो रुपयांच्या बीएमडब्लू, ऑडी यांसारख्या गाड्या घेऊन फिरायचे; पण वाहतूक नियमांचे पालन करायचे नाही, असेही अतिशहाणे पुण्यात आहेत. मुंढव्यात एका बीएमडब्लू चालकाला अडविल्याने त्याने थेट पोलिसांच्या अंगावर धावून जात, ‘तू बीएमडब्लू अडवून तिची इज्जत काढतो का? तुझा पगार किती?’ असे विचारणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली. त्यानंतर दोनच दिवसांनी आरटीओ चौकात ऑडीचालकाने सीटबेल्ट लावला नसल्याने त्याला अडविण्यात आले. त्यानेही पोलिसाला ‘१०० रुपये घे आणि बाजूला हो,’ असे म्हणून वाद घातला. दंड न भरता तो पळून गेला. त्याला पोलिसांनी अटक केली. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होतो. यामध्ये मानसिक, आर्थिक, सामाजिक सर्वच प्रकारचे नुकसान होत आहे. यापेक्षा पोलिसांनी अक्षेपार्ह वर्तन केल्यास त्याची वरिष्ठांकडे तक्रार करून त्यावर कारवाई करण्यास भाग पाडता येते.