
मध्य रेल्वे मार्गावर पुढील काही दिवसांतच स्वयंचलित दरवाजाची नॉन-एसी लोकल धावणार आहे. ही वैशिष्टय़पूर्ण लोकल नियमित वेळापत्रकात समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने सध्या कार्यवाही सुरू झाली आहे. वातानुकूलित लोकलप्रमाणेच स्वयंचलित दरवाजाच्या नव्या लोकलची रचना असून ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या स्थानकांवर चालवली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये मुंब्रा येथे पाच प्रवाशांचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाला. त्या अपघातानंतर मध्य रेल्वे मार्गावर प्राधान्याने स्वयंचलित दरवाजाची लोकल दाखल करण्याच्या हालचालींना गती देण्यात आलो होती. त्यानुसार सप्टेंबरअखेरीस स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकलची चाचणी कुर्ला कारशेडमध्ये घेण्यात आली होती. त्या चाचणीतील निष्कर्षांचा अभ्यास करून स्वयंचलित दरवाजाची लोकल प्रत्यक्ष प्रवासी सेवेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांतच ही स्वयंचलित दरवाजाची लोकल प्रवासी सेवेत दाखल केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
z रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर नजीकच्या काळात 18 डब्यांच्या लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने पश्चिम रेल्वेने जानेवारीच्या मध्यावर विरार-डहाणू रोड सेक्शनवर 18 डब्यांच्या ईएमयू रेकसाठी आपत्कालीन ब्रेकिंग डिस्टन्स आणि कप्लर फोर्स चाचण्यांचे नियोजन केले आहे. 14 आणि 15 जानेवारी रोजी चाचण्या केल्या जाणार आहेत. बॉम्बार्डियर-क्लास रेकची चाचणी 110 किमी प्रतितास वेगाने करण्याचा प्रस्ताव आहे, तर मेधा इलेक्ट्रिकल्ससह रेकची चाचणी 105 किमी प्रतितास वेगाने करण्याचा प्रस्ताव आहे.


























































