
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला परवानगी दिली आहे. मात्र, 28 मे रोजीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या संचालकांच्या परिपत्रकामुळे या भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे हे अन्यायकारक परिपत्रक रद्द करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरावी, शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करावा या मागणीसाठी ‘बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार, 17 जूनला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शिक्षण संचालकांच्या परिपत्रकाची होळी करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी उतरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देविदास पंडागळे यांनी दिली.