
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी सुरू असतानाच ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱयांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायमूर्ती आर.जे. तांबे यांनी सिंह यांना अटक करून कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश दिल्याने सिंह यांच्या अडचणी आता आणखीनच वाढल्या आहेत.
परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून काही पोलीस अधिकाऱयांनी आपल्याला धमक्या देऊन साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान, रिजाय भाटी आणि केतन तन्ना यांनी केला होता. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सिंह यांना चौकशीसाठी अनेकदा बोलावण्यात आले, पण ते सतत गैरहजर राहिले. त्यामुळे अखेर ठाणे न्यायालयाने सिंह यांच्याविरोधात वॉरंट बजावले आहे. न्यायमूर्ती आर.जे. तांबे यांनी काढलेल्या या अजामीनपात्र अटक वॉरंटमध्ये परमबीर सिंह यांचा पत्ता हाऊस नंबर 133, सेक्टर 27, चंदीगढ असा नमूद केला आहे, तर त्यांच्यावर 384, 386, 387, 391 आदी बारा कलमे लावण्यात आली आहेत.
चांदीवाल आयोगानेदेखील परमबीर सिंह यांच्याविरुद्ध वॉरंट काढले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचा पगारही थांबविण्यात आला. आता ठाणे न्यायालयानेही सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.






























































