
उत्तर नगर जिह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. श्रावणसरी कोसळत असल्याने डोंगरदऱयांवरील धबधबे पुन्हा प्रवाहित झाले असून, ओढे-नाले खळखळू लागले आहेत. गेल्या 12 तासांत धरणात 340 दलघफू पाणी नव्याने आल्याने 11 हजार 39 दलघफू क्षमतेच्या ‘भंडारदरा’तील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी 10 हजार 19 दलघफू (90.76 टक्के) झाला होता. पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याने भंडारदरा धरण स्वातंत्र्यदिनी ‘ओव्हरफ्लो’ होण्याची परंपरा यंदाही कायम राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंगळवारी दुपारनंतर पाणलोटात पावसाने काहीसा जोर पकडला होता. त्यामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे. निळवंडे धरणातही पाण्याची चांगली आवक होत आहे. सायंकाळी 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 7454 दलघफू झाला होता. प्रत्यक्षात सोडल्या जाणाऱया पाण्यापेक्षा धरणात आवक होणारे पाणी अधिक असल्याने धरण व्यवस्थापनाकडून आता ही दोन्ही धरणे तुडुंब करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. येत्या आठ दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास स्वातंत्र्यदिनापूर्वीच भंडारदरा व निळवंडे धरणांचा पाणीसाठा सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
मुळा पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने मुळा नदीतील विसर्ग काल मंगळवारी सकाळी 1873 क्युसेकपर्यंत होता. तो सायंकाळी 2984 क्युसेक झाला होता. धरणात आवक वाढल्याने मुळा धरणातील पाणीसाठा 20 हजार 921 दलघफू (80.46 टक्के) झाला होता.
































































