हुडीबाबा! 2019 चा डिसेंबर ठरला 119 वर्षातला दुसरा सर्वाधिक थंड महिना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Weather: Winter in North India
Prayagraj: Commuters cross a railway track on a cold and wintry morning in Prayagraj (Allahabad), Saturday, Dec. 28, 2019. (PTI Photo)(PTI12_28_2019_000047B)

राजधानी दिल्ली आणि आसपासच्या शहरात 1901 नंतर 2019 चा डिसेंबर महिना हा दुसरा सर्वाधिक थंडीचा महिना म्हणून नोंदवण्यात आला. मंगळवारी दिल्लीचे किमान तापमान सोमवारच्या तुलनेत दोन अंशांनी वाढून 4.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. तर सोमवारी दिल्लीचे कमाल तापमान 9.4 अंश सेल्सिअस इंतके नोंदवण्यात आले. 1901 नंतर दिल्लीत हा सर्वाधिक थंड दिवस नोंदविण्यात आला.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच बुधवारपासून राजधानीत कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. परंतु काही राज्यात थंडीचा कडाका असाच राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की दिल्लीचे सरासरी कमाल तापमान डिसेंबरमध्ये 18.76 अंश सेल्सिअस झाले होते. या आधी डिसेंबर 1997 मध्ये 17.3 डिग्री सेल्सियस नंतर 119 वर्षातील दुसरे कमाल तापमान आहे. त्याचप्रमाणे 1901 नंतर चार वेळा 1919, 1920, 1961 आणि 1997 मध्ये तापमान 20 अंश सेल्सिअसच्या समान किंवा त्याहून कमी नोंदवण्यात आले होते. 1919 आणि 1929 मध्ये तापमान 19.8 डिग्री सेल्सियस होते. 1961 मध्ये 20 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले होते. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी राजधानी दिल्लीचे किमान तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविला. दिल्ली वगळता अन्य राज्यात शीतलहर कायम राहील. तसेच उत्तर प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये सलग 18 व्या दिवशी थंडीचा कडाका

आयएमडीच्या प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी हाडं गोठवणारा दिवस नोंदविण्यात आला. त्यासोबतच डिसेंबरमध्ये सलग 18 दिवस कडाक्याची थंडी अनुभवता आली. या आधी दिल्लीकरांनी 1991 मध्ये सलग 17 दिवसांची कडाक्याची थंडी अनुभवली होती. मात्र 2019 मध्ये हा रेकॉर्ड मोडला.

श्रीवास्तव म्हणाले की 1992 नंतर दिल्लीमध्ये 1997, 1998, 2003 आणि 2014 या चार वर्षात तीव्र थंडी नोंदवण्यात आली होती.

ट्रेन तसेच विमाने उशिराने

मंगळवारी धुके कमी झाल्याने उत्तर हिंदुस्थानातील विमानांची उड्डाणे काहीशा उशिराने झाली. मात्र कोणतेही उड्डाण रद्द झाले नाही किंवा वळविण्यात आले नाही. रेल्वे वाहतूक मात्र अद्याप सुधारलेली नाही. गाड्यांचे वेळापत्रक अद्यापही बिघडलेले आहे. उत्तर रेल्वे विभागात, कमीतकमी 34 गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेच्या एका तास ते 15 तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. भुवनेश्वर-आनंद विहार संपर्क क्रांति 15 तास, पुरी-आनंद विहार निलांचल 13 तास, दिल्ली-गोमती एक्सप्रेस 5 तास आणि चेन्नई-निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस 8 तास उशिराने धावली.

कश्मीर-हिमाचलमध्ये हिमवृष्टीसह नवीन वर्षाचे स्वागत

हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात नवीन वर्षाचे स्वागत जोरदार बर्फवृष्टीने होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात 31 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान जास्त पाऊस आणि उंच पर्वतांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जम्मू-कश्मीरमध्ये रात्रीच्या तापमानात किंचित सुधारणा झाली आहे. रविवारी-सोमवारी रात्री ऋण 6.5 अंश सेल्सिअसच्या तुलनेत श्रीनगरमध्ये सोमवार-मंगळवारी रात्री किमान ऋण 3.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हिमाचल प्रदेशात मंगळवारी ऋण 8.2 अंश सेल्सिअस सोबतच केयलोंग सगळ्यात थंड राहिला. शिमलामध्ये 1.2 अंश सेल्सिअस कालपा मध्ये ऋण 3 अंश सेल्सिअस, कुफरीमध्ये ऋण1.8 अंश सेल्सिअस मनालीमध्ये ऋण 1.4 अंश सेल्सिअस सोलन मध्ये ऋण 0.6 अंश सेल्सिअस आणि डलहौसी मध्ये ऋण 0.4 अंश सेल्सिअस न्यूनतम तापमान नोंदवले गेले. हवामान खात्याने बुधवारी कश्मीर खोऱ्यात हिमवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे.

प्राणीसंग्रहालय वाघांसाठी हिटर

आसाममधील स्थानिक प्राणी संग्रहालयात वाघ आणि सिंहांचे कडाक्य़ाच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणाच्या बाहेर इलेक्ट्रिक हिटर बसवण्यात आले आहेत. प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख अधिकारी प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिण व इतर प्राण्यांना उब मिळण्यासाठी हिटर लावले गेले आहेत.